लालपरीअभावी खोळंबले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:39 AM2021-09-26T04:39:51+5:302021-09-26T04:39:51+5:30

भेंडाळा परिसरातील बोरी, कळमगाव, एकोडी, कान्होली, वेल्तूर तुकूम, सगनापूर, वाघोली, घारगाव, फराडा, मार्कंडा अशा अनेक गावांतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज ...

Education of students in rural areas was hampered due to lack of red carpet | लालपरीअभावी खोळंबले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण

लालपरीअभावी खोळंबले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण

googlenewsNext

भेंडाळा परिसरातील बोरी, कळमगाव, एकोडी, कान्होली, वेल्तूर तुकूम, सगनापूर, वाघोली, घारगाव, फराडा, मार्कंडा अशा अनेक गावांतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज चामोर्शी, गडचिरोली व भेंडाळा येथे जावे लागते; परंतु शासन-प्रशासन यांच्या नियमानुसार एसटी महामंडळाने ज्या रस्त्यावर उत्पन्न जादा मिळते, अशाच ठिकाणी एसटी बसफेरी सुरू केली आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवासाविना आजही ग्रामीण भागात वर्ग ८ वी ते १२ वीचे शंभरवर विद्यार्थी शाळेत जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बससुविधा नसल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक बस बंद असल्याने आपली कामे वेळेवर करू शकत नाहीत. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे शक्य होत नाही. त्यामुळे भेंडाळा परिसरातील बसफेऱ्या लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. ग्रामीण भागात एसटी बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना ५० ते १०० रुपये खर्च करून प्रवास करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही गैरसोय दूर करून विद्यार्थ्यांना एसटी बसची सुविधा मिळवून द्यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थी करीत आहेत.

(बॉक्स)

गोरगरीब विद्यार्थ्यांना बसतोय फटका

कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशात कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाल्याने शासनाने जेथे कोरोनामुक्त गावे आहेत व ग्रामपंचायतीने तसा ठराव दिला अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काही पालक पाल्यांना शाळेत पाठवीत नाहीत, तर काही खासगी वाहनाने, तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडतात. मात्र, गरीब विद्यार्थी लालपरीविना शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Education of students in rural areas was hampered due to lack of red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.