गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची प्रभावी अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:17 AM2017-05-19T00:17:17+5:302017-05-19T00:17:17+5:30

शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास मंजुरी प्रदान केली.

Effective execution of sedimentary waste, slurry | गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची प्रभावी अंमलबजावणी करा

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची प्रभावी अंमलबजावणी करा

Next

ए. एस. आर. नायक : तीन तालुक्यांमध्ये कामाची पाहाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास मंजुरी प्रदान केली. या अंतर्गत असणाऱ्या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले आहेत. या सोबतच मामा तलाव दुरुस्तीची कामे देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी नायक यांनी गेल्या दोन दिवसात देसाईगंज, कुरखेडा, गडचिरोली तालुक्यात सुरु असलेल्या कामांना भेटी देऊन या कामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.
देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे मामा तलावातून गाळ काढला जावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. याच गावात पूर्ण झालेल्या सिंचन विहिरीची त्यांनी पाहणी केली.
जिल्ह्यात विशेष मोहिमेंतर्गत ११ हजार विहिरी बांधण्यात येत आहेत. ज्यांच्या विहिरींचे काम पूर्ण झाले आहे, अशा शेतकऱ्यांची यादी त्यांच्या शेतजमीन क्षेत्राच्या नोंदीसह उपविभाग स्तरावर एकत्रित करण्यात यावी आणि या सर्वांपैकी इच्छुकांना वीज जोडणीसाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले.

वनतलावातील पायऱ्यांसाठी प्रस्ताव सादर करा
चिखली गावानजिक वन विभागातर्फे खोदण्यात आलेल्या वन तळ्यासही जिल्हाधिकारी नायक यांनी भेट दिली. यावेळी येथील वन अधिकारी चांदेकर यांनी याबाबत माहिती दिली. तळ्यामुळे वन्य जीवांना जंगलाच्या आतच पाणीसाठे उपलब्ध होणार आहेत. मात्र त्यांना पाण्यापर्यंत जाणे येणे शक्य व्हावे यासाठी पायरीवजा रचना गरजेची आहे. पूर्ण झालेल्या अशा सर्व वन तळ्यांमध्ये अशी व्यवस्था करण्यासाठी २०१७-१८ च्या जिल्हा नियोजन मंडळ निधीतून मदत करू, आपण प्रस्ताव सादर करा, या प्रकारच्या सूचना नायक यांनी यावेळी दिल्या.

मजुरांशी केला मुक्तसंवाद
कोरेगावलगतच्या साठवण तलावांची पाहणी करुन जिल्हाधिकारी नायक यांनी येथील रोहयो मजुरांशी मुक्त संवाद साधला. या ठिकाणी साधारण १२०० स्त्री, पुरुष मजूर कामासाठी तयार आहेत. त्यापैकी २०० जणांच्या मस्टरची अडचण सोडविण्यात यावी, असे निर्देश चर्चेअंती त्यांनी दिले. या ठिकाणी जुलै अखेरपर्यंत रोहयोचे काम देण्याची मागणी येथील मजूर स्त्रियांनी केली.
गडचिरोली नजिक असणाऱ्या पारडी येथील जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी नायक यांनी केली. कृषी विभाग, तहसीलदार, बांधकाम तसेच पाटबंधारे आदी विभागांच्या तालुकास्तर अधिकाऱ्यांची बैठक येथील उपविभागीय कार्यालयात घेऊन त्यांना ‘गाळमूक्त धरण व गाळयुक्त शिवार’ची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

Web Title: Effective execution of sedimentary waste, slurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.