शेतकरी अपघात विमा याेजनेची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:37 AM2021-02-16T04:37:02+5:302021-02-16T04:37:02+5:30
गडचिराेली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याेजनेंतर्गत गडचिराेली तालुक्यासह जिल्हाभरात दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी अर्धेअधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...
गडचिराेली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याेजनेंतर्गत गडचिराेली तालुक्यासह जिल्हाभरात दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी अर्धेअधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. या याेजनेत किचकट अटी समाविष्ट करण्यात आल्या असून, मंजुरीची प्रक्रियाही दिरंगाईची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीची ही अपघात विमा याेजना केवळ मृगजळ ठरत आहे.
शासनाच्या वतीने शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी सन २००५-०६ पासून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेचे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. मात्र योजनेसाठी ढीगभर कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते तसेच विमा कंपनीकडून सातत्याने त्रुटी काढण्यात येत असल्याने अनेक प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत.
किचकट प्रणालीमुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात अशा अपघातग्रस्त राज्यातील सर्व वहितीधारक शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य अशा दोन जणांना या योजनेचा लाभ दिला जातो. विम्यासाठी वारसा हक्क प्रपत्र क व व्हिसेरा ही महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु ही प्रमाणपत्रे सहा-सहा महिने मिळत नाही. त्यामुळे साहजिकच प्रस्ताव सादर करण्यास व तो मंजूर करण्यास विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यात दमछाक होते. त्यामुळे अनेक कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.
बाॅक्स...
..अशी आहे देय मदत
गाेपीनाथ मुंडे शेतकरी याेजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय अथवा एकाच वेळी एक हात, एक पाय, एक डोळा निकामी झालेल्या शेतकऱ्यांना दाेन लाखांची मदत देण्यात येते. तसेच एक डोळा, एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये मदत दिली जाते.