मोहझरीची पाणी पुरवठा योजना रखडली
By admin | Published: May 30, 2014 12:03 AM2014-05-30T00:03:41+5:302014-05-30T00:03:41+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे ५९ लाख रूपयाच्या किमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम अर्धवटच ठेवून काम बंद करण्यात आले.
वैरागड : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे ५९ लाख रूपयाच्या किमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम अर्धवटच ठेवून काम बंद करण्यात आले. यामुळे मोहझरीवासीयांना ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी मोहझरी येथे नदीपत्रात विहीर बांधण्यात आली. गावापर्यंत नळाची पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र यानंतरचे काम करण्यात न आल्याने पाणी पुरवठा योजना बारगळली. नळ पाणी पुरवठा योजनेच्या काम कंत्राटदाराला देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने विहिर खोदली, पाईपलाईन टाकली. मात्र सदर दोनही कामे निकृष्ट दर्जाची केली. परिणामी गतवर्षीच्या पावसाळ्यात जी पाईपलाईन जागोजागी उखडली. नळ योजनेचा पाणी पुरवठा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली उपपाईपलाईनचे जाळे संबंधित कंत्राटदाराने गावात पसरविले नाही. या कामाकडे संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत केली जाते. मोहझरी येथे नळ योजनेचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर काम पूर्ण करण्याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. यामुळेच मोहझरी येथील नागरिकांना यंदाच्याही उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागल्याची खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.