वेलगूर फाट्यावर आठ तास चक्काजाम; वाहतूक ठप्प
By admin | Published: September 15, 2016 01:52 AM2016-09-15T01:52:14+5:302016-09-15T01:52:14+5:30
तालुक्यातील विविध मूलभूत समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात वेलगूर, बोटलाचेरू,
हजारो नागरिक रस्त्यावर : बबलू हकीम यांनी केली एसडीओंशी चर्चा
अहेरी : तालुक्यातील विविध मूलभूत समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव, वेलगूर टोला व किष्टापूर येथील हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून बुधवारी आलापल्ली-मुलचेरा मार्गावरील वेलगूर बायपास फाट्यावर तब्बल आठ तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे मुलचेरा-आलापल्ली, वेलगूर-किष्टापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
अहेरी तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही समस्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे त्रस्त झालेले हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात बुधवारी पहाटे ४.३० वाजता वेलगूर फाट्यावर गोळा झाले. येथे पहाटे ५ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी लागलीच आंदोलनस्थळ गाठले. यावेळी आंदोलनकर्त्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांना रस्त्याची दुरवस्था दाखविली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अहेरी येथील उपविभागीय अभियंता मडावी, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अभियंता चिंतावार, गंपावार यांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली. १६ सप्टेंबर रोजी सर्व विभाग प्रमुखांशी आपण चर्चा करून वेलगूर परिसरातील रस्ता दुरूस्तीचे काम सुरू करून इतर समस्या मार्गी लावू, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे, चांगदेव कोळेकर, छाया तांबुसकर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्तीने नागरिकांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
याप्रसंगी मुश्ताक हकीम, राजेश्वर उत्तरवार, पं. स. सदस्य आत्माराम गद्देकार, वेलगूरचे ग्रा. पं. सदस्य आदिल पठाण, इरफान पठाण, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालुरकर, सलिम शेख, पुष्पा अलोणे, नागेश कर्मे, वेलगूरच्या सरपंच कुसूम दुधी, किष्टापूरच्या सरपंच अंजना पेंदाम, तंमुस अध्यक्ष रवींद्र उरेते, नागो कस्तुरे, लिंगा गोेलेटी, तुकाराम झोळे, विलास शेंडे, हरिचंद्र पोटरंगे, दिलीप दुर्गे, दीपक चुनारकर, श्यामराव कुमरे, देवराव माडावार, रवी गावतुरे, अरविंद खोब्रागडे, ऋषी सडमेक आदी उपस्थित होते.
यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चक्काजाम आंदोलनामुळे तब्बल आठ तास वाहतूक ठप्प झाल्याने आलापल्ली-मुलचेरा मार्गावर दोन्ही बाजुस शेकडो वाहनांची रांग लागली होती. वेलगूर भागातील समस्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या नागरिकांनी प्रशासनाला यावेळी दिला. (प्रतिनिधी)