आठ प्राथमिक शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:01 AM2019-01-11T00:01:40+5:302019-01-11T00:02:46+5:30
पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
निर्मला रमेश घुटके, सविता संजय भिलकर, सचिन नंदकिशोर साळवे, वनिश्याम बळीराम म्हस्के, बेबी सोमाजी घुग्गुसकर, जगदिश भोगराज मडावी, कविता चंद्राजी गोंगले, निलीमा कोठारे असे निलंबित झालेल्या शिक्षक व शिक्षिकांची नावे आहेत.पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत शासनाच्या बदली पोर्टलवर खोटी माहिती भरून स्थानांतरण करून घेतले होते. चौकशीमध्ये ते दोषी आढळल्याने सात शिक्षकांना भामरागड तालुक्यात तर एका शिक्षकाला सिरोंचा तालुक्यातील शाळेवर नियुक्ती देण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या निर्णयाविरोधात संबंधित शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिले होते. मात्र सुनावणीदरम्यान त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा नियमाप्रमाणे भामरागड व सिरोंचा तालुक्यातच नियुक्ती देण्यात आली होती. पण संबंधित शिक्षक कर्तव्यावर रूजू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. परिणामी महाराष्टÑ जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ (१) (अ) नुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कर्तव्यातील कसूर भोवली
एकाच वेळी आठ शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. दुर्गम भागात सेवा देण्यास कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांसाठी ही मोठी चपराक आहे. केवळ बदलीसाठी खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली. सदर शिक्षकांवर कारवाई झाल्याने किमान पुढील वर्षी अशी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती शिक्षक भरणार नाही, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.