विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास आठ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:41 AM2017-11-22T00:41:21+5:302017-11-22T00:41:34+5:30
वर्गात पेपर सोडवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास येथील येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वर्गात पेपर सोडवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास येथील येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अमोल दुधराम बारसागडे रा. भाडभिडी असे दोषी इसमाचे नाव आहे.
पीडित विद्यार्थिनी ही २० आॅक्टोबर २०१६ रोजी शाळेत पेपर सोडवित होती. आरोपी शिक्षक अमोल दुधराम बारसागडे हा पर्यवेक्षक म्हणून वर्गावर उपस्थित होता. पीडित विद्यार्थिनी वर्गात पेपर सोडवीत असताना अमोल बारसागडे तिच्या जवळ गेला. त्यानंतर त्याने त्या विद्यार्थिनीच्या शेजारी बसून तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांनी अमोल बारसागडेविरुद्ध घोट पोलीस मदत केंद्रात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी २० आॅक्टोबर २०१६ रोजी अमोल बारसागडेवर भादंवि कलम ३५४(अ) व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमाच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याच दिवशी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने पीडित मुलगी व अन्य साक्षदारांचे बयाण नोंदवून, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी अमोल बारसागडे यास भादंवि कलम ३५४(अ) अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपयांचा दंड आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमान्वये पाच वर्षांचा कारावास व अडीच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सदर निकाल जिल्हासत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी दिला.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.