एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 19:45 IST2021-11-10T19:39:32+5:302021-11-10T19:45:31+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षल्यांकडून) दिलेलीच नाही.

एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक व्हायरल
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षल्यांकडून) दिलेलीच नाही. ती तथाकथित धमकी म्हणजे स्टंटबाजी असून त्याचा आम्ही निषेध करतो, असे पत्रक भाकपाचा(माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने काढले आहे. दरम्यान, ना. शिंदे यांना धमकीचे पत्र नेमके कुठून आले याचा तपास अजून सुरूच असल्याचे समजते.
जिल्ह्यातील लोहखाणींची लीज आणि खाणींविरोधातील आंदोलन या विषयाला धरून प्रवक्ता श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात सत्तापक्षातील मंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली आहे. खाणींविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यावरून वडेट्टीवार यांना, तर लोहप्रकल्प उभारण्यावर ठाम असण्यावरून शिंदे यांना त्याने लक्ष्य केले. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातच लोहखाणीची लीज देण्यात आली. भाजप-शिवसेनेच्या सरकारने अन्य कंपन्यांना लीज वाटप केली. त्यामुळे वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सुरजागड खाण खोदण्याच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते. सत्ता आणि कायदा यांच्या हातात असताना सुरजागड खाण बंद करण्याचा आदेश का देत नाही? असा सवाल प्रवक्ता श्रीनिवासने पत्रकातून केला आहे. कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून वडेट्टीवार यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली हा बहाणा होता, असा आरोप त्यांनी केला. हे पत्रक सोशल मीडियावर फिरत असले तरी ते नक्षल्यांकडून जारी झाले किंवा नाही याबाबतची सत्यता कळू शकली नाही.