पानटपरीवर रंगताहेत निवडणुकीच्या चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:36 AM2021-01-03T04:36:00+5:302021-01-03T04:36:00+5:30

गडचिराेली : पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यात आले. त्यामुळे इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शहरातील चौकात, ...

Election discussions are in full swing on Pantpari | पानटपरीवर रंगताहेत निवडणुकीच्या चर्चा

पानटपरीवर रंगताहेत निवडणुकीच्या चर्चा

Next

गडचिराेली : पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यात आले. त्यामुळे इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शहरातील चौकात, पानटपरीवर तसेच सोशल मीडियावर विविध चर्चाही रंगत आहेत.

बेरोजगार भत्ता लागू करावा

देसाईगंज : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगाराची कुठलीही व्यवस्था संबंधित विभागाने केली नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. शासनाने बेरोजगारांसाठी सुरू केलेली कर्ज योजना मृगजळ ठरत आहे. त्यामुळे बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी बेरोजगार भत्ता लागू करावा, अशी मागणी बेरोजगारांकडून होत आहे.

रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी

आरमाेरी : करोडो रुपये खर्च करून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याने अल्पावधीतच रस्ता उखडत असल्याने शासनाला मोठा फटका बसत असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी, रस्त्याची दुरवस्था झाल्यास कंत्राटदाराला दोषी ठरवून त्याच्याकडून भरपाई घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

स्पर्धा परीक्षेचे वर्ग भरविण्याची मागणी

चामाेर्शी : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना युवकांसाठी लॉकडाऊनमध्ये बार्टीतर्फे माेफत स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेण्यात आले. याचा अनेक गरजंवतांना फायदा झाला. अशा प्रकारचे वर्ग पुन्हा भरविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलत आहे. शहरात याबाबत शिकवणी वर्गातून माहिती मिळते. मात्र ग्रामीण भागातील युवकांकडे अशी कुठल्या प्रकारची व्यवस्था राहत नसल्याने त्यांना अडचण जात आहे.

एसटीचे टिकीट कमी करण्याची मागणी

अहेरी : लाॅकडाऊननंतर आता एसटी सुरू झाली आहे. मात्र तिकीट जास्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीचे तिकीट कमी करण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामीण रस्त्यांची झाली दुरवस्था

धानाेरा : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेमुक्त रस्ते मोहीम राबवून गावखेड्यांतील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

स्वच्छता मोहीम गतिमान करावी

आष्टी : शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावर खाद्यपदार्थ

विकणाऱ्यांवर आळा घाला

कुरखेडा : शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक दहशतीत आहेत. अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बंदी घालणे गरजेचे आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा

घाेट : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

कोरपना : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी हाेत आहे.

एटापल्लीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

एटापल्ली : मागील काही दिवसांपासून डास व कीटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फवारणी करण्याची मागणी केली आहे.

नियमित लाईनमन नसल्याने त्रास

काेरची : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

नागरिकांना अद्यापही रस्त्यांची प्रतीक्षा

वैरागड : रस्त्यामुळे गावाचा विकास होतो. मात्र पक्के रस्तेच नसल्यास विकास खुंटतो. तालुक्यातील काही रस्ते पक्के नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सिराेंचा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.

डेकोरेशन संचालकांचे नुकसान सुरूच

भामरागड : कोरोनामुळे यावर्षी मंडप-डेकोरेशन संचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता दिवाळी संपली असून लग्नतारखाही आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बुकिंगच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने ५० ऐवजी किमान २०० नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त

मुलचेरा : मागील काही महिन्यामध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Election discussions are in full swing on Pantpari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.