राजनगरी अहेरीत निवडणुकीची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:00 AM2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:32+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक प्रतिमेकडे पाहून मतदान होत असल्याचे मानले जाते. तरीली यावेळी विविध पक्षांचे लोक तयारीला लागले आहेत. युवा वर्गातील उत्साह पाहता अहेरीत नवीन विकास आघाडीचा पर्याय पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहेरी नगरपंचायतमध्ये १७ प्रभागात तब्बल ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित ८ प्रभागातही महिला उमेदवारांना नामांकन भरण्याचा मार्ग मोकळा असल्याने नगरातील अनेक रणरागिनींना जनसेवा करण्याची संधी मिळणार आहे. 

Election front in Rajnagari Aheri | राजनगरी अहेरीत निवडणुकीची मोर्चेबांधणी

राजनगरी अहेरीत निवडणुकीची मोर्चेबांधणी

Next
ठळक मुद्देयुवकांमध्ये आकर्षण : २९ ला संपणार नगर पंचायतीची मुदत, १० ला आरक्षण सोडत

n  विवेक बेझलवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येत्या २९ नोव्हेंबरला मुदत संपणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार अहेरी नगरपंचायत क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून या निवडणुकीबाबत युवा वर्गात विशेष आकर्षण असल्याचे दिसत आहे. 
     अहेरी नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणारे हवसे-गवसे कोणत्या प्रभागासाठी कोणते आरक्षण निघते याकडे लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. १० नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत निघणार आहे. या सोडतीनंतरच इच्छुक उमेदवार आपले पत्ते उघड करतील.
पाच वर्षांपूर्वी अहेरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत राजकीय पक्षांना नियोजन करणे कठीण झाले होते. परंतु आताची स्थिती खूप वेगळी आहे. नगरपंचायत निवडणुकीचा अभ्याससुद्धा स्थानिक राजकीय मंडळी व पक्षाच्या नेत्यांना झाला आहे. युवा वर्गामध्ये विशेष उत्साह दिसत असल्याने यावेळच्या निवडणुकीत फार चढाओढ वाढण्याची शक्यता आहे. नगर पंचायत निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून स्थानिक राजकीय पक्षांमधील पुढारी, भावी उत्सुक उमेदवार आणि युवा वर्ग विविध मागण्यांचे निवेदन, आंदोलन व  राजकीय स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत. येत्या १० नोव्हेंबरला १७ प्रभागातील आरक्षण स्पष्ट झाल्यावर कोणा-कोणाला संधी मिळते आणि कोणाचा अपेक्षाभंग होतो ते स्पष्ट होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक प्रतिमेकडे पाहून मतदान होत असल्याचे मानले जाते. तरीली यावेळी विविध पक्षांचे लोक तयारीला लागले आहेत. युवा वर्गातील उत्साह पाहता अहेरीत नवीन विकास आघाडीचा पर्याय पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहेरी नगरपंचायतमध्ये १७ प्रभागात तब्बल ९ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित ८ प्रभागातही महिला उमेदवारांना नामांकन भरण्याचा मार्ग मोकळा असल्याने नगरातील अनेक रणरागिनींना जनसेवा करण्याची संधी मिळणार आहे. 
अहेरी नगरपंचायतअंतर्गत प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय अनुसूचित जाती तसेच जमातींची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या क्षेत्र सीमांकन नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण याबाबत नव्याने तयार झालेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जात आहे. त्यामध्ये मागील निवडणुकीत असलेले आरक्षित क्षेत्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माजी नगरसेवकांना आपले आरक्षण किंवा आपला प्रभाग यावेळी मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे नव्याने होणारी प्रभागरचना ही कोणास फायद्याची आणि कोणाच्या तोट्याची ठरणार याकडे लक्ष लागले आहे.

नागरिकांसमोर होणार आरक्षण सोडत
नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक २०२० च्या संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूपाला मान्यता दिलेली आहे. नगर पंचायतीच्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या महिला, अनुसूचित जमातीच्या महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केल्या जाणार आहेत. ही सोडत १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नगरपंचायत अहेरी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने जागा निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी ज्या नागरिकांना इच्छा असेल त्यांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपंचायततर्फे करण्यात आले आहे.

पुरूषांपेक्षा महिला मतदार जास्त
अहेरी  राजनगरीत एकूण ११ हजार ७१९ मतदार आहेत. त्यात ५७९६ पुरुष तर ५९२३ महिला मतदार आहेत. पुरूष मतदारांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असल्याने मतदारांनी ठरविल्यास नगर पंचायतीत महिलाराज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Web Title: Election front in Rajnagari Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.