नगर पंचायतीची निवडणूक वॉर्ड पध्दतीने होणार
By admin | Published: August 3, 2015 01:08 AM2015-08-03T01:08:02+5:302015-08-03T01:08:02+5:30
पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेली निवडणुकीची प्रभाग पध्दती बाद करण्यात आली असून जिल्ह्यातील १० नगर पंचायतीच्या निवडणुका वॉर्ड पध्दतीने होणार आहेत.
आखणी सुरू : प्रशासन लागले कामाला
कुरखेडा : पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेली निवडणुकीची प्रभाग पध्दती बाद करण्यात आली असून जिल्ह्यातील १० नगर पंचायतीच्या निवडणुका वॉर्ड पध्दतीने होणार आहेत. त्यामुळे मतदार संघाचा आकार लहान होऊन उमेदवारांची दमछाक कमी होणार आहे.
राज्य शासनाने तालुका मुख्यालयाच्या १० ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दिला आहे. या १० ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या १० ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम प्रस्तावित आहे.
पूर्वी तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची प्रभाग पध्दती अस्तित्वात होती. त्यावेळी एका प्रभागातून दोन अथवा दोनपेक्षा अधिक सदस्य निवडून येत असत. मात्र जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या १० ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्याने येथील निवडणूक प्रभाग पध्दतीऐवजी वार्ड पध्दतीने घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे व त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक नगर पंचायतीमध्ये वार्ड आखणीचे काम जोमात सुरू आहे.
आरमोरी, कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व आरमोरी या १० ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य राहणार आहेत. प्रत्येक नगर पंचायतीची १७ वार्डांमध्ये विभागणी करण्यात येत आहे.
प्रभागऐवजी वार्ड पध्दती अस्तित्वात येत असल्याने मतदारांची संख्या कमी होणार आहे. तसेच भौगोलिक क्षेत्रही कमी होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची पूर्वीच्या तुलनेत दमछाक कमी होणार आहे. एका वार्डातून एक सदस्य निवडून येणार असल्याने त्याच्यावरील जबाबदारी निश्चितच वाढणार आहे. निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)