१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:14 AM2018-08-29T01:14:55+5:302018-08-29T01:16:02+5:30
आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
कोरची तालुक्यातील पिटेसूर, मोठाझेलिया, धानोरा तालुक्यातील मुंगनेर, अहेरी तालुक्यातील आवलमरी, एटापल्ली तालुक्यातील सेवारी, सरखेडा, वडसा खुर्द, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, मेंढरी बुज., भामरागड तालुक्यातील बोटणफुंडी कुव्वाकोडी, परायनार, फोदेवाडा, नेलगुंडा, धिरंगी, हेडरी व टेकल या १९ ग्रामपंचायींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. एटापल्ली तालुक्यतील जांभिया येथे सरपंच पदाची थेट निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी निवडण्ूक विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सोमवारी २७ आॅगस्ट रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.
लोकशाहीसाठी निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अमूल्य अधिकार बहाल करण्यात आला आहे. गावाच्या विकासासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कुणाच्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, तसेच ग्रामपंचायत सदस्यपदासाठी जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम भागातील
ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, त्यातील बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आहेत. नक्षल चळवळीचा प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येत असले तरी नक्षल प्रभावित गावांमध्ये निवडणुका घेणे पोलीस व निवडणूक प्रशासनासमोरचे मोठे आवाहन आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जनतेतून सरपंचाची निवड करायची आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांना विशेष उत्सुकता आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तुलनेत सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे.