चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढली
By admin | Published: August 7, 2015 01:14 AM2015-08-07T01:14:19+5:302015-08-07T01:14:19+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक १४ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे.
१९ जागांसाठी ११३ अर्ज : १४ सप्टेंबरला होणार मतदान
चामोर्शी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक १४ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला ५ आॅगस्ट रोजीपर्यंत एकूण १९ जागांसाठी ८२ उमेदवारांची ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस वाढली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ उमेदवार निवडून द्यायचे असून यातील सर्व साधारणसाठी असलेल्या सात जागांसाठी ४० उमेदवारांनी ५४ नामांकन अर्ज दाखल केले आहे. महिलांसाठी दोन जागा राखीव असून येथून पाच महिलांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. इतर मागासवर्गीयांच्या एका जागेसाठी आठ उमेदवारांनी १० नामांकन अर्ज दाखल केले आहे. तसेच भटक्या जाती व विमुक्त जमाती प्र्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांनी पाच नामांकन अर्ज दाखल केले आहे. अशा प्रकारे ११ जागांसाठी ५६ उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल करून विक्रम नोंदविला आहे.
ग्राम पंचायत मतदार संघातून निवडून द्यावयाच्या चार जागांपैकी सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी नऊ उमेदवारांनी १४ नामांकन अर्ज, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांनी सहा अर्ज व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाच्या एका जागेसाठी चार उमेदवारांनी सहा नामांकन अर्ज दाखल केले आहे. व्यापारी व अडते मतदार संघातील दोन जागांसाठी चार उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले आहे. हमाल-मापारी व तोलारी मतदार संघातून एका जागेसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करून या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा जि. प. चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी स्वत: उमेदवारी अर्ज दाखल करून पूर्ण पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शरद कोलेटीवार, माजी सभापती त्रियुगी नारायण दुबे, सुखदेव दादाजी नैताम, माजी पं. स. उपसभापती बंडू चिळंगे, पं. स. सदस्य प्रमोद भगत, चंद्रकांत दोशी, किशोर दोशी, विशेष दोशी, श्यामराव लटारे, विनायक आभारे, अरूण बंडावार, निकेश गद्देवार, बाबुराव कुकडे, नाजुक वाळके, विनायक पोरटे, गोसाई सातपुते या दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली असून चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)