रस्त्यावरील विद्युत खांब हटणार
By admin | Published: November 4, 2014 10:40 PM2014-11-04T22:40:21+5:302014-11-04T22:40:21+5:30
शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
गडचिरोली शहरातील आरमोरी, धानोरा, चामोर्शी व मुल या राज्य महामार्गावरून दरदिवशी हजारो वाहने धावतात. शहराची वाढती लोकसंख्या व वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेतली तर या मार्गांचे रूंदीकरण होणे आवश्यक होते. मात्र रस्त्याच्या बाजूला दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांची रूंदी कमी झाली आहे. रस्ते अरूंद असतांनाच नगर परिषदेने चारही मार्गावर रस्ता दुभाजक बांधले आहे. या रस्ता दुभाजकामुळे रस्त्यांची रूंदी आणखी कमी झाली आहे. रस्ता दुभाजक बांधतेवेळी रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविणे आवश्यक होते. विद्युत खांबांना वाहने धडक देऊन आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. सदर विद्युत खांब हटविण्याची मागणी नागरिकांकडून मागील २ वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र नगर परिषद प्रशासन व विद्युत विभागसुद्धा याकडे सोयीस्कर कानाडोळा करीत होते.
गडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यास आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रूंदीकरणाचे हाती घेतले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर विद्युत खांब फार मोठी अडचण निर्माण करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे चारही मार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. चारही मार्गावर भूमिगत विद्युत लाईन टाकली जाणार आहे. नगर परिषदेने चारही मार्गावरील विद्युत खांब, डीपी हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर काम कंत्राटदाराच्या मार्फतीने करण्यात येत आहे.
भूमिगत विद्युत लाईन टाकल्यानंतर ठराविक अंतरावर विद्युत डिस्ट्रीब्युशन बॉक्स बसविण्यात आले आहेत. या बॉक्सच्या शेजारी विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत. या विद्युत खांबावरून नागरिकांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे. विद्युत खांब हटल्यामुळे अपघातामध्ये घट होईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)