जंगल भागात कृषी पंपासाठी विजेची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:49+5:302021-09-15T04:42:49+5:30
देसाईगंज तालुक्यातील अर्धा-अधिक भाग हा ईटीयाडोह या धरणाच्या पाण्याने सिंचित होत आहे.पलीकडील भागात मात्र गाढवी नदीमुळे तो भाग सिंचन ...
देसाईगंज तालुक्यातील अर्धा-अधिक भाग हा ईटीयाडोह या धरणाच्या पाण्याने सिंचित होत आहे.पलीकडील भागात मात्र गाढवी नदीमुळे तो भाग सिंचन होत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विहीर वा कूपनलिका खोदून सिंचनाची सुविधा केलेली आहे. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली आहे. त्यातच हे शेतकरी आपले पीक घेत आहेत. विहीरगाव, चिखली रिठ, डोंगरगाव हलबी, शिरपूर, भगवानपूर देऊळगाव , पिंपळगाव हलबी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वनविभागाची जागा ताब्यात घेऊन व तेथील वने संपुष्टात आणून त्या ठिकाणी शेती उठविली आहे. त्यापैकी काहीच शेतकऱ्यांना शासनाने वनजमिनीचे पट्टे देऊन नियमित केले आहेत. तर काहींनी लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट करीत त्या ठिकाणी जागा उठीत करुन त्या ठिकाणी शेतजमिनी काढून स्वखर्चाने विहीर वा कूपनलिका तयार केली आहे. या परिसरात ज्यांना वनपट्टे मिळाले आहेत त्या लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले आहेत. त्या ठिकाणावरून गेलेल्या वीज तारांवर अतिक्रमणधारक शेतकरी हुक टाकून विजेची चोरी करीत आहेत. हा शेती परिसर जंगलव्याप्त भाग असल्याने या ठिकाणी महावितरणचे अधिकारी वा कर्मचारी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे चांगले फावत असून यामुळे महावितरणला लाखोंचा चुना लावत आहे. याउलट जे शेतकरी महावितरणचे नियमाकुल ग्राहक आहेत त्यांनाच मात्र वीज बिल भरण्याबाबत नेहमीच तंबी दिली जात आहे.