मीटर न लावताच वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:43 PM2017-12-08T22:43:29+5:302017-12-08T22:43:50+5:30
तळोधी येथील एका शेतकऱ्याने कृषी पंपासाठी दीड वर्षापूर्वी डिमांड भरला होता.
आॅनलाईन लोकमत
तळोधी (मोकासा) : तळोधी येथील एका शेतकऱ्याने कृषी पंपासाठी दीड वर्षापूर्वी डिमांड भरला होता. परंतु या शेतकऱ्याला महावितरण कंपनीच्या वतीने मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. परंतु मीटर न लावताच वीज बिल पाठविल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तळोधी (मोकासा) येथील शेतकरी विश्वनाथ लहानू कुनघाडकर यांनी सर्वे नं. ४६३ मध्ये पौर नदीकडील शेतीत पिकाला पाणी करण्यासाठी वीज मीटर घ्यायचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केला. त्यांनी ६ हजार २०० रूपयांची डिमांड रक्कम २३ फेब्रुवारी २०१६ ला भरली. जेथून विद्युत पोल टाकून प्रवाह घ्यायचा आहे तो सर्वे नजीकचे शेतकरी बंडू कुनघाडकर यांच्या शेतातून टाकण्याची परवानगी घेऊन तसा सर्वेही विद्युत विभागास दीड वर्षापूर्वीच झाला. परंतु चुकीच्या ठिकाणातून विद्युत पोल टाकण्यात आले. याबाबत विद्युत अभियंता सचिन महल्ले यांना ३० नोव्हेंबर रोजी या संदर्भात विचारणा केली असता, तडकाफडकी मीटर लावल्याचे सांगितले. तसेच ही बाब छोटी आहे, अशा बातम्या आपल्याकडे खुप आहेत, असे उत्तर दिले. सर्वे नं. ४६३ मध्ये पौर नदीकाठावरील शेतात डिमांड भरून दीड वर्षापासून मीटरची वाट पाहावी लागली. परंतु पोल उभे करून काम लाभार्थी शेतकऱ्यास न विचारताच ठेकेदाराने आपल्याच मताने यामावार व बोलगमवार यांच्या शेतातून पोल उभे केले. या संदर्भात लोकमत प्रतिनिधीने विचारले असता, तडकाफडकी त्या लाईनवरील एका पोलला फक्त लावून ठेवले. प्रत्यक्षात याची माहितीच संबंधित शेतकऱ्याला दिली गेली नाही. प्रतिनिधीने संबंधित शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करतेवेळी दीड तासाने मीटर लावलेले ठिकाण दिसले. परंतु लांबविलेल्या लाईनवर विद्युत प्रवाह अजुनपर्यंत सुरू केला नाही. ठेकेदाराने काम पूर्ण दाखवून मीटर लावल्याचे ठेक्यानुसार पूर्णता दाखवून बिल उचलले, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
चुकीच्या ठिकाणी लावलेल्या मीटरमध्ये १ हजार ८६० रूपये वीज बिल यासह पुरवठा दिनांक, मागील रिडिंग व मीटर क्रमांकाची नोंद आहे.
कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी
डिमांड भरून दीड वर्ष उलटला, सर्वेक्षही झाला. परंतु ठेकेदाराने सर्वेनुसार पोल न टाकता दूरवर पोल टाकले. प्रकरण अंगलट येईल म्हणून विद्युत अभियंत्यांनी तडकाफडकी मीटर एका पोलला टेकून दिले. या शेतकऱ्यांनी अटकाव केल्यावर मला त्या ठिकाणातून विद्युत प्रवाह सुरू करणे अडचणीचे होणार आहे. प्रत्यक्षात मला अन्य विद्युत साहित्य घ्यावे लागणार ते कसे घेणार. त्यामुळे पोल टाकण्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी विश्वनाथ कुनघाडकर यांनी केली आहे.