बैलबंडीवर वीज कोसळून दोन बैल ठार
By Admin | Published: May 23, 2014 11:51 PM2014-05-23T23:51:51+5:302014-05-23T23:51:51+5:30
तालुक्यातील आसरअल्ली परिसरात बुधवारी वादळ व विजेच्या कहराने नागरिकांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले. सोमनपल्ली येथे बैलबंडीवर वीज कोसळल्याने दोन बैल जागीच ठार तर बैलबंडीवरील
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात बुधवारी वादळ व विजेच्या कहराने नागरिकांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले. सोमनपल्ली येथे बैलबंडीवर वीज कोसळल्याने दोन बैल जागीच ठार तर बैलबंडीवरील पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये सोमनपल्ली येथील श्रीनिवास गावडे (३०), व्यंकटेश गावडे (२८), संतोष गावडे (१६), इस्लम श्रीदेवी चंद्रय्या व रायगुडम येथील सत्यम कोडापे यांचा समावेश आहे. श्रीनिवास गावडे हे इतरांसह बैलबंडीने इंद्रावती नदीघाटावर असलेल्या तेंदूपत्ता फळीवर तेंदूचे पुडके नेण्यासाठी गेले होते. तेंदू पुडके जमा केल्यानंतर बैलबंडीवरून परत येत असतांना अचानक वादळ सुरू झाले. विजेचा कडकडाट सुरू होताच अचानक बैलबंडीवरच वीज कोसळली. यात बैलबंडीला जुंपलेले दोेन बैल जागीच ठार तर बैलबंडीवरील पाच जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना अंकिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले. सदर घटनेचा तलाठी सचिन मडावी यांनी पंचनामा केला. वादळामुळे आसरअल्ली येथील ३० ते ४० घरांची पडझड झाली. तसेच अनेकांच्या घरावरील टिनपत्रे, कवेलू उडाले. अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले. परिसरातील लावण्यात आलेल्या तेंदूपत्ता फळीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील नुकसानीचे त्वरित सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)