कमी मनुष्यबळावर वीज विभागाचा डोलारा

By admin | Published: July 11, 2016 01:15 AM2016-07-11T01:15:52+5:302016-07-11T01:15:52+5:30

गडचिरोली शहरात एकूण १७ हजार वीज ग्राहक आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार

Electricity department's low-power manpower | कमी मनुष्यबळावर वीज विभागाचा डोलारा

कमी मनुष्यबळावर वीज विभागाचा डोलारा

Next

गडचिरोलीतील २५ टक्के पदे रिक्त : कार्यालय व कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या
गडचिरोली : गडचिरोली शहरात एकूण १७ हजार वीज ग्राहक आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार २५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना गडचिरोली शहरात सहायक अभियंत्यासह केवळ १८ वीज कर्मचारी कार्यरत आहेत. तर सात पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस राबावे लागत आहे. वीज खंडीत होण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे वीज विभागाने गडचिरोली शहरासाठी आवश्यक तेवढे वीज कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

गडचिरोली शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहराचा विस्तार मागील चार ते पाच वर्षांपासून झपाट्याने होत चालला आहे. नवीन वस्त्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर वीजेचे ग्राहकसुध्दा वाढत चालले आहेत. गडचिरोली शहराची सद्य:स्थितीत लोकसंख्या ५० हजार एवढी आहे. तर १७ हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वीज विभागावर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार १२ हजार ५०० ग्राहकांसाठी २० कर्मचारी व त्यापुढील एक हजार ग्राहकांसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त वीज कर्मचारी असणे आवश्यक आहे. या नियमाप्रमाणे गडचिरोली शहरात एकूण २५ वीज कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र केवळ १८ च कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना अधिकचे काम करावे लागत आहे. शहरी भागातील ग्राहक ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तुलनेत जागरूक आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होताच वीज विभागाचा दूरध्वनी खनखनायला लागतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारीचे त्याचवेळी निरसन करणे आवश्यक आहे. एक-दोन तास जरी विज पुरवठा सुरळीत झाला नाही तर वीज ग्राहकांच्या रोशाचा सामना वीज कर्मचाऱ्यांना करावा लागतो. गडचिरोली शहरात वीज कार्यालय व वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. वीज ग्राहकांसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांमध्येही अशा घटनांमुळे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वीज विभागाने गडचिरोली शहरासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)

मेंटनन्सपेक्षा वसुलीवरच भर
वीज बिलाची वसुली थकल्यास वीज कंपनी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने वीज कंपनी वीज बिलाच्या वसुलीवरच अधिक भर देते. वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच वसुली करण्याचे कामही वीज कर्मचाऱ्यांनाच करावे लागते. किंबहुना वसुलीला अधिक प्राधान्य दिले जाते. दोन्ही कामे एकावेळी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गडचिरोली शहरात कार्यरत बहुतांश कर्मचारी वयस्क आहेत. त्यांच्याकडे वीज दुरूस्तीचा अनुभव असला तरी त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. तरीही ते रात्रंदिवस काम करीत आहेत. शहरी भागासाठी नव्या दमाचे कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Web Title: Electricity department's low-power manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.