गतवर्षीपेक्षा वीजवापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:44 AM2018-05-05T00:44:38+5:302018-05-05T00:44:38+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे चार दशलक्ष युनिट विजेचा वापर वाढला आहे. ग्राहकसंख्या वाढण्याबरोबर दिवसेंदिवस प्रत्येकाच्या घरी विजेवर चालणारी साधने वाढल्याने विजेचा वापर वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे चार दशलक्ष युनिट विजेचा वापर वाढला आहे. ग्राहकसंख्या वाढण्याबरोबर दिवसेंदिवस प्रत्येकाच्या घरी विजेवर चालणारी साधने वाढल्याने विजेचा वापर वाढला आहे.
घरातील बहुतांश स्वयंचलीत उपकरणे विजेवर चालत असल्याने वीज ही अत्यावश्यक गरज बनली आहे. हा दृष्टीकोन समोर ठेवूनच केंद्र व राज्य शासनातर्फे प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचवून प्रत्येक नागरिकाला वीज जोडणी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे ग्राहक संख्येमध्ये वाढ होऊन विजेचा वापर वाढत चालला आहे.
त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर प्रत्येक व्यक्ती अधिकाधिक विजेवर चालणारी घरगुती साधने खरेदी करते. त्यामुळेही विजेचा वापर वाढत चालला आहे. वीज विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०१७ एप्रिल या महिन्यात गडचिरोली सर्कल अंतर्गत ५४.२४ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला होता. तर २०१८ मधील एप्रिल महिन्यात ५८.३३ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ४.०९ दशलक्ष युनिट वीजचा वापर वाढला आहे.
विजेवर चालणारी बहुतांश उपकरणे सुखोपयोगी कामांसाठी वापरली जातात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारल्याबरोबर संबंधित व्यक्ती सदर साधने खरेदी करीत असल्याने विजेचा वापर आपसुकच वाढणार आहे. विजेचा अपव्यय न करता वाढलेला वापर हा समाजाच्या प्रगतीचे लक्षण मानल्या जाते. मात्र वीज निर्मितीमुळे होणारा पाणी व दगडी कोळशाचा वापर लक्षात घेता विजेचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
वर्षभरात १० हजार ३८७ नवीन ग्राहक
लोकसंख्या वाढीबरोबरच वीज ग्राहकांच्या संख्येत भर पडते. शहरातील नवीन वस्त्यांमध्ये वीज पुरवठा झाल्यानंतर ग्राहकांची संख्या वाढते. मागील वर्षभरात जिल्हाभरातील १० हजार ३८७ नागरिकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. नवीन ग्राहक वाढल्याने विजेची मागणी वाढून विजेचा वापर वाढला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास २५० गावे अंधारात होती. त्यापैकी वर्षभरात वीज विभागाने १५० गावांना वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये विजेचा वापर होऊन विजेची मागणी वाढली आहे.
गडचिरोली सर्कल कार्यालयांतर्गत एकूण २ लाख ५५ हजार ५७२ घरगुती, ११ हजार ८३१ व्यावसायिक, २ हजार १८१ औद्योगिक ग्राहक आहेत.
३ हजार ६६३ मीटर उपलब्ध
मध्यंतरी वीज मीटरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे डिमांड भरूनही नागरिकांना वीज मीटर उपलब्ध होत नव्हते. वीज जोडणी मिळत नसल्याने नागरिकांना घर बांधूनही अंधारातच राहावे लागत होते. यावर्षी मात्र वीज विभागाने पुरेसे मीटर उपलब्ध करून दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी तीन हजार मीटर व शहरी भागासाठी ६६३ वीज मीटर उपलब्ध झाले आहेत.
वीज मीटर उपलब्ध असले तरी वीज विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार वीज मीटर लावून देताना विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.