ग्रामीण भागात वीजचोरी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:48+5:302021-09-27T04:39:48+5:30
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज ...
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकोडा टाकून वीजचोरी केली जात आहे. सावर्जनिक सण-उत्सवाच्या कालावधीत वीजचोरीचे प्रकार वाढत असतात. ग्रामीण भागातही काही लाेक वीजचाेरीमध्ये पुढे असल्याचे दिसून येते.
तालुक्यातील मद्यपी वाहनचालकांकडे दुर्लक्ष
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाल्यामुळे मद्यपी वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. इंदिरा गांधी चाैकापासून हाकेच्या अंतरावर पाेलीस स्टेशन आहे. मात्र कठाेर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही समस्या गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. वारंवार पाठपुरावा करून साैरदिव्यांबाबत कार्यवाही झाली नाही.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. वनहक्क पट्ट्याची कार्यवाही गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. माेकाट जनावरांमुळे आष्टी शहरात आजवर अनेकदा अपघात घडले आहेत.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली, मात्र कार्यवाही नाही.