तहसील कार्यालयात वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:10 PM2018-01-27T23:10:27+5:302018-01-27T23:10:45+5:30
येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिवसाढवळ्या विजेची चोेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आॅनलाईन लोकमत
अहेरी : येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिवसाढवळ्या विजेची चोेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तालुक्याचा कारभार पाहणाºया या तहसील कार्यालयातच तारांवर आकडा टाकून विजेची चोरी होत असल्याने नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसीलदार व इतर अधिकाºयांना माहित असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे.
अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या स्वभावामुळे तालुक्यातील जनता बरीच त्रस्त झाली आहे. गावाच्या मध्यभागी असलेले तहसील कार्यालय त्यांनी आपल्या मनमर्जीने दोन किमी अंतरावर असलेल्या मंडळ कार्यालयात हलविले. त्याच ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमही घेतला. अपुºया सोयीसुविधा व जागा यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर विभागाच्या कर्मचाºयांना नाहक त्रास सहन करावा लागला. नियोजनाचेही तीनतेरा वाजले. त्यात भर म्हणजे तहसील कार्यालयाच्या वतीनेच विजेची चोरी करून रंगारंग कार्यक्रम घेण्यात येत होते.
याबाबत तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना विचारणा केली असता, याबाबत मला माहित नाही, वीज चोरी झाली असेल तर ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले. आता महावितरणच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.