जिल्ह्यात अडीच लाख रुपयांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:43 PM2019-05-13T22:43:53+5:302019-05-13T22:44:13+5:30

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या.

Electricity worth 2.5 lakh rupees in the district | जिल्ह्यात अडीच लाख रुपयांची वीजचोरी

जिल्ह्यात अडीच लाख रुपयांची वीजचोरी

Next
ठळक मुद्दे२६ हजार युनिटची चोरी : दीड महिन्यात २१ वीज चोरट्यांना पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत एप्रिल व मे २०१९ या कालावधीत गडचिरोली, आलापल्ली विभागात वीज चोरट्यांविरूद्ध विविध प्रकारच्या मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २१ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. सदर चोरट्यांनी २ लाख ५५ हजार रुपयांच्या तब्बल २६ हजार ७४९ युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. या वीज चोरट्यांविरोधात वीज कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली.
मार्च, एप्रिल, मे या महिन्यात विजेचा वापर जास्त असतो. त्यामुळे वीज बिल कमी करण्याच्या लालसेपायी वीज चोर वीज चोरीकडे वळतात. परंतु अशाही स्थितीत महावितरणची करडी नजर चोरट्यांवर असते. वीज मीटरमध्ये छेडछाड करून चोरी करण्याचे प्रकार महावितरणच्या मोहिमेत उघडकीस आले आहे. वीज मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे, सर्किटमध्ये फेरफार करणे आदी प्रकारातून वीज चोरी केली जाते.
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यानंतर माणसाला शिक्षणाचीही गरज आहे. अशाच प्रकारे सध्याच्या आधुनिक युगात वीज पुरवठा ही महत्त्वपूर्ण गरज झाली आहे. विजेवर विविध उपकरणे चालविता येतात. शिवाय विविध प्रकारच्या व्यवसायासाठीही वीज पुरवठा आवश्यक असतो. महावितरणच्या वतीने घरगुती व व्यावसायिक अशा दोन प्रकारची वीज जोडणी दिल्या जाते. वीज पुरवठ्याची गरज असलेल्या नागरिकांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर महत्त्वपूर्ण दस्तावेजासह रितसर अर्ज सादर करून महावितरणकडून वीज जोडणी घ्यावी, वीज मीटर उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन केले जाते. अनेक नागरिक रितसर वीज जोडणी घेतात. मात्र काही नागरिक आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून लगतच्या घरून स्वत: राहत असलेल्या घरी किंवा आपल्या दुकानामध्ये वीज पुरवठा घेतात.
एप्रिल ते मे २०१९ या कालावधीत गडचिरोली विभागात ९ वीज चोरट्यांनी ६२ हजार रुपये किमतीच्या ९ हजार वीज युनिटची तर आलापल्ली विभागात १२ वीज चोरट्यांनी १ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या १७ हजार ७४९ इतक्या वीज युनिटची चोरी केल्याचे मोहिमेत उघड झाले आहे. या चोरट्यांवर वीज कायदा २००३ चे कलम १३५ व १३८ अन्वये महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
वर्षभरात आढळले १८९ वीजचोर
महावितरणच्या वतीने दरवर्षीच्या उन्हाळ्यात वीज चोरट्यांविरूद्ध मोहीम राबविली जाते. तसेच महावितरणची ही मोहीम वर्षभर सुरू असते. एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात आलापल्ली व गडचिरोली हे दोन विभाग मिळून एकूण १८९ चोरट्यांची वीज चोरी पकडण्यात आली. यात चोरट्यांनी २६ लाख ४३ हजार रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी झाल्याचे आढळून आले. आलापल्ली विभागात ४८ वीज चोरट्यांनी ५ लाख ८० हजार तर गडचिरोली विभागात १४१ वीज चोरट्यांनी २० लाख ६३ हजार रुपये किमतीच्या वीज युनिटची चोरी केली आहे.

Web Title: Electricity worth 2.5 lakh rupees in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.