चामाेर्शीतील हत्तीगेट तुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:05+5:302021-03-05T04:36:05+5:30
गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३५ चे बांधकाम सुरू आहे. चामोर्शी शहरामध्ये उजव्या बाजूला प्रवेशद्वार (हत्तीगेट) आहे. ...
गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३५ चे बांधकाम सुरू आहे. चामोर्शी शहरामध्ये उजव्या बाजूला प्रवेशद्वार (हत्तीगेट) आहे. या प्रवेशद्वारामुळे रस्ता चौपदरीकरणाचे काम शक्य नसल्याने प्रवेशद्वार हटाविण्याबाबत उपविभागीय कार्यालयात दि. ४ मार्च रोजी गुरुवारला सभा आयोजित करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायत प्रशासक उत्तम तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेला तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, मुख्याधिकारी सतीश चौधरी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागन्नाथ पाटील, तालुका भाजपाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका शिवसेनाप्रमुख अमित यासलवार, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विनोद खोबे, माजी सभापती विजय शातलवार, साईनाथ बुरांडे, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता अशोक उपाध्याय, अभियंता निखिल कारेकर, पवन बडघरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर प्रवेशद्वारावर असलेली लक्ष्मीची मूर्ती व हत्ती चामोर्शीवासीयांच्या भावनेचा व आस्थेचा विषय असल्याने त्याची विटंबना होणार नाही याची दक्षता घेऊन पूजाअर्चा करून लक्ष्मीची मूर्ती हलविण्याचे ठरविण्यात आले. या मूर्तीची बाजार चौकातील हनुमान मंदिरात विधीवतपणे तात्पुरती प्रतिष्ठापना करण्याचे ठरले. प्रवेशद्वाराची पुनर्बांधणी करण्यासाठी रस्ते बांधकाम कंपनीशी बोलणी करण्याचे कार्यकारी अभियंता अशोक उपाध्याय यांनी मान्य केले.