मंगलाचा मुक्त विहार भंगला... मग संतापली अन् दुचाकी पायाखाली चिरडली
By संजय तिपाले | Published: June 25, 2023 12:56 PM2023-06-25T12:56:17+5:302023-06-25T12:56:53+5:30
कमलापूर कॅम्पमधील घटना: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
संजय तिपाले, गडचिरोली : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प गडिचरोलीतील कमलापूर (ता. अहेरी) येथे आहे. या कॅम्पमध्ये मुक्त विहार करत असलेल्या मंगला हत्तीणीला एका अतिउत्साही दुचाकीस्वार तरुणाने डिवचले. त्यामुळे तिचा पारा चढला, मग तिने सोंडेने दुचाकी खाली पाडली अन् पायाखाली चिरडली. २४ जूनला सायंकाळी ही घटना घडली.
कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एूण आठ हत्ती आहेत. या हत्तींचे वनविभागाकडून पालन- पोषण केले जाते. दररोज सायंकाळी या हत्तींना कॅम्पमध्ये मोकळे सोडले जाते. दरम्यान, २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता एका दुचाकीस्वार तरुणाने कमलापूर-दामरंचा रस्ता ओलांडताना मंगला हत्तीणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तिच्या जवळ जाऊन वेगवेगळे आवाज काढले व हातवारे करुन तिच्या विहारात व्यत्यय आणला. त्यामुळे मंगला हत्तीण चवताळली. तिने सोंड पुढे केल्यावर दुचाकी सोडून तरुणाने पळ काढला. त्यानंतर हत्तीणीने सोंडेने दुचाकी फिरवली व पायाखाली चिरडली. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित इतर तरुणांनी मोबाइलमध्ये कैद केला. याची चित्रफित सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पर्यटनप्रेमींनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान, कमलापूर कॅम्पमध्ये हत्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील हा एकमेव कॅम्प असून तेथे पर्यटकांची रेलचेल वाढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, काही अतिउत्साही तरुण हत्तीला डिवचण्याचा प्रयत्न करतात. त्यातून असे प्रकार होतात. आतापर्यंत या कॅम्पमध्ये हत्तीने कोणावरही हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. मात्र, शनिवारी तरुणाने केलेल्या उपद्व्यापामुळे पर्यटनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
गडचिरोली: मंगला हत्तीणीला एका अतिउत्साही दुचाकीस्वार तरुणाने डिवचले. तिचा पारा चढला, मग तिने सोंडेने दुचाकी खाली पाडली अन् पायाखाली चिरडली.#gadchirolipic.twitter.com/gTTeSBOv5W
— Lokmat (@lokmat) June 25, 2023