ट्रॅक्टरमधील धानावरही हत्तींची वक्रदृष्टी; शेतातील ५० पाेती धानाची नासधूस
By गेापाल लाजुरकर | Published: November 22, 2023 09:37 PM2023-11-22T21:37:53+5:302023-11-22T21:38:00+5:30
कळपाकडून रात्रभर धुडगूस
गडचिराेली : धान कापणीसह बांधणी व मळणीचे काम जाेमात सुरू आहे. अशातच मंगळवारी रानटी हत्तींनी चांभार्डा खैरी रिठ येथील एका शेतकऱ्याने शेतात ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये ठेवलेल्या ५० पाेती धानाची नासधूस रात्रीच्या सुमारास केली. गडचिराेली तालुक्याच्या चांभार्डा येथील शेतकरी उमाजी चनेकार यांनी ठेकापद्धतीने केलेल्या शेतातील धानाची मळणी मंगळवारी दुपारच्या सुमारास केली. ५० पाेती धानाची मळणी करण्यास सायंकाळच झाली. धानाचे पाेती ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये आणत असतानाच दुसऱ्याच बांधीत ट्राॅली फसली.
फसलेली ट्राॅली काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यासह अन्य मजुरांनी केला. यासाठी दुसरे ट्रॅक्टरसुद्धा बाेलावले. याच प्रयत्नात अंधार झाला. दरम्यान, डाेंगराच्या मार्गाने रानटी हत्ती जाेरजाेरात ओरडत येऊ लागले. तेव्हा कसाबसा आपला जीव वाचावा यासाठी उमाजी चनेकार यांच्यासह त्यांची दाेन्ही मुले व अन्य मजुरांनी शेतातून काढता पाय घेतला. रात्री ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास रानटी हत्ती शेतात दाखल झाले व हत्तींनी संपूर्ण रात्रभर ट्राॅलीत दाेरखंडाने बांधलेले संपूर्ण ५० पाेती धानाची नासधूस केली. यात शेतकऱ्याचे १ लाख रुपयांवर नुकसान झाले.
चाेहीकडे पसरवले धानाचे पाेते
रानटी हत्तींच्या कळपाने ट्राॅली ठेवलेल्या बांधीपासून जवळपासच्या चार ते पाच बांध्यांमध्ये धानाचे पाेती पसरवली हाेती. प्लास्टिक धाग्यांच्या पाेत्याची जणूकाही चिरफाड हत्तींनी केली. त्यामुळे दाेन ते तीन बांध्यांमध्ये धान पसरले हाेते.
कळपाकडून रात्रभर धुडगूस
रानटी हत्तींनी उमाजी चनेकार यांच्या शेतात रात्रभर धुडगूस माजविला. सकाळच्या सुमारास जेव्हा चनेकार यांची मुले व काही लाेक शेतात गेले असता त्यांना हत्तींचा कळप धान खाण्यात दंग असल्याचा दिसून आला.
शासनाच्या जीआरनुसार शेतातील उभ्या धान पिकाचीच नुकसानभरपाई देता येते. तरीसुद्धा संबंधित शेतकऱ्याला भरपाई देण्यासंदर्भात पावले उचलली जातील. शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याची कार्यवाही केली जाईल.- धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वनविभाग वडसा