दारूविक्री विरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:17 AM2018-10-27T01:17:54+5:302018-10-27T01:18:21+5:30
गावातील अवैध दारू विक्री धंद्याला कायमचे संपवायचे, या एकाच ध्यासाने येवली गावसंघटनेच्या बैठकीमध्ये सर्व महिला व पुरूष सदस्यांनी मिळून गावातील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गावातील अवैध दारू विक्री धंद्याला कायमचे संपवायचे, या एकाच ध्यासाने येवली गावसंघटनेच्या बैठकीमध्ये सर्व महिला व पुरूष सदस्यांनी मिळून गावातील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय केला.
मुक्तिपथतर्फे येवली येथे गाव संघटनेची सभा घेऊन महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. २५ आॅक्टोबरला संध्याकाळी येवली येथील ग्राम पंचायत सभागृह येथे बैठक पार पडली. यावेळी गावातील महिलांनी रॅली काढून गावातील दारू विक्री बंदीच्या कामाची सुरूवात केली. ‘दारूची बाटली फुटलीच पाहिजे, बायकांची हलाखी मिटलीच पाहिजे’ असे नारे व घोषणा देत महिला गावातील दारू विक्रेत्यांच्या घरी गेल्या. यावेळी त्यांनी दारू विक्रेत्यांना गावात दारू विक्री न करण्यास सांगितले. १२ दारू विक्रेत्यांना लेखी नोटीस देण्यात आली. आजपासून दारू विक्री बंद करा. नाही तर उद्यापासून गाव संघटना कारवाई करेल, असा अल्टीमेटमच गावातील महिलांनी दारू विक्रेत्यांना दिला आहे. यावेळी गावातील सरपंच अश्विनी भांडेकर, पोलीस पाटील लक्ष्मीछाया मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेखा भांडेकर, चोखाजी भांडेकर, प्रेमिला चुधरी, ज्योत्स्ना कुनघाडकर, तिलक गेडाम, मिथुन बांबोळे व सर्व दारू तंबाखूमुक्त गाव संघटना सदस्य उपस्थित होते. यावेळी मुक्तिपथ गडचिरोली तालुका चमूने गाव संघटना सदस्यांना मार्गदर्शन केले.