जनशक्तीरूपी दुर्गेच्या माध्यमातून नक्षलवादाचा भस्मासूर संपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:48 PM2019-09-30T12:48:02+5:302019-09-30T12:48:24+5:30
दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष्य रेखाटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादरूपी भस्मासुराने पोखरलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे म्हणजे एक आव्हानच. लोकशाहीतील या प्रक्रियेत नक्षलवाद्यांकडून प्रत्येक वेळी विविध प्रकारचे अडथळे आणले जातात. हे अडथळे पार करत जिल्ह्याच्या अतिसंवेदनशिल भागातील नागरिक भरभरून मतदान करतात. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही नागरिकांनी आपल्यातील जनशक्तीरूपी दुर्गेला गावागावात उभे करून नक्षलवादरूपी भस्मासुराला संपवण्याचा निर्धार करण्याचे चित्रमय आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष्य रेखाटले आहे.
‘जनशक्तीची दुर्गा गावागावात करू उभी, विकासाचा ध्वज फडकवत ठेवू नभी. सारे मिळून संपवुया, भस्मासूर नक्षलवादाचा, गावात नांदेल शांती, नाश होईल हिंसाचाराचा’ अशा ओळींसह पोलीस दलाने जिल्हावासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्षलवादाला न जुमानता निवडणुकीत भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले आहे.