कुष्ठरोग निर्मूलन ही सामाजिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:28 PM2018-03-19T23:28:42+5:302018-03-19T23:28:42+5:30
कुष्ठरोगावर प्रभावी औषध असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याबाबत माहिती नाही. परिणामी कुष्ठरोगाचे अनिष्ट परिणाम कुष्ठरोग्याला भोगावे लागतात.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कुष्ठरोगावर प्रभावी औषध असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याबाबत माहिती नाही. परिणामी कुष्ठरोगाचे अनिष्ट परिणाम कुष्ठरोग्याला भोगावे लागतात. कुष्ठरोगाचा समूळ नायनाट करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालय गडचिरोलीच्या वतीने कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कुष्ठरोग निर्मूलन जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालयाचे जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम, पर्यवेक्षक राजेश पराते, उमेश जंग्गावार, महेश दंदे, ठाकरे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. नागरिकांमध्ये जागृती करून कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याने जिल्हाधिकारी शेखरसिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. चित्ररथावर कुष्ठरोगाबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्ररथावर लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रिनवर १५ मिनिटांची चित्रफित दाखविली जात आहे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी चित्ररथ नेऊन जनजागृती केली जात आहे. संपूर्ण जिल्हा पिंजून काढला जाणार आहे. खासदार अशोक नेते तसेच इतर मान्यवरांनी या कार्याची प्रशंसा केली. जनजागृती मोहीम अधिकाधिक दिवस चालू ठेवावी, असे आवाहन केले.
जिल्हाभर फिरणार कुष्ठरोग चित्ररथ
कुष्ठरोगाबाबत जागृती करण्यासाठी स्वतंत्र चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सदर चित्ररथ जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी फिरविले जाणार आहे. कुष्ठरोग जनजागृतीची व्यापक प्रमाणातून जिल्ह्यात पहिल्यांदाच हाती घेण्यात आली आहे.