महामार्गाच्या कामात खोदण्यावरच भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:37 AM2019-03-10T00:37:57+5:302019-03-10T00:39:11+5:30
मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास दीड किमीपर्यंतचा मार्ग मधेमधे खोदण्यात आला आहे. मात्र सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम अजुनही सुरुवात झाले नाही. रहदारीसाठी अर्धाच मार्ग शिल्लक असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जवळपास दीड किमीपर्यंतचा मार्ग मधेमधे खोदण्यात आला आहे. मात्र सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम अजुनही सुरुवात झाले नाही. रहदारीसाठी अर्धाच मार्ग शिल्लक असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
धानोरा मार्गावरील स्नेहनगरापासून राष्ट्रीय महामार्गाच्या खोदकामाला सुरूवात झाली. जवळपास तीन महिन्यांपूर्वी खोदकाम सुरू झाले. काही दिवसानंतर खोदकाम बंद पडले. मागील दोन महिन्यांपासून सातत्याने काम सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने एक बाजू खोदली जात आहे. स्नेहनगर ते मूल मार्गावरील तलावापर्यंत मधेमधे मार्ग खोदण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिक्रमणाची समस्या असल्याने त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले नाही. तसेच बाजुला नालीचेही बांधकाम सोबतच केले जात आहे. ५२ हजार लोकसंख्येच्या गडचिरोली शहरात चार प्रमुख मार्गांवरच वाहतुक मोठ्या प्रमाणात राहते. त्यातही धानोरा मार्गावर बसस्थानक व मूल मार्गावर जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व विविध कार्यालये असल्याने या मार्गावरून सर्वाधिक वाहतूक राहते. वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन महामार्गाचे खोदकाम झाल्याबरोबर त्या ठिकाणी गिट्टी टाकून सिमेंट काँक्रीटीकरण करणे आवश्यक होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून केवळ एक बाजू खोदून ठेवण्याचे काम केले जात आहे. मात्र सिमेंट काँक्रीटीकरणाचा अजूनपर्यंत पत्ता नाही. ज्या ठिकाणावरून कामाला सुरूवात झाली होती. त्या ठिकाणी मागील तीन दिवसांपासून गिट्टी टाकण्याचे काम सुरू आहे.
मुख्य मार्गाला लागूनच शहरात जाणारे मार्ग आहेत. त्याही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जड वाहन, चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना मुख्य चौकातूनच आपल्या घराकडे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पेट्रोल खर्च होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
अतिक्रमण कायम
केवळ अर्धा मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याने अतिक्रमण काढणे आवश्यक होते. मात्र नगर परिषद व बांधकाम विभागानेही याकडे कायमचे दुर्लक्ष केले आहे. पूर्वीप्रमाणेच अजुनही रस्त्यावर दुकाने थाटून व्यवसाय चालविला जात आहे. काही ठिकाणी विजेचे खांब रस्त्यावर आले आहेत. अशा ठिकाणी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते. पाच ते दहा मिनिटातच वाहनांची मोठी रांग दोन्ही बाजुला लागते. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर परिषद व बांधकाम विभागाने अतिक्रमीत दुकाने हटविणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात साचणार डबके
महामार्गाच्या सध्याच्या कामाची गती लक्षात घेतली तर पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटीकरणचे काम पूर्ण होईल काय? याबाबत शंका निर्माण होत आहे. जुन्या मार्गाच्या तुलनेत जवळपास दोन ते तीन फूट खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट झाले नाही तर खोदलेल्या ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील नाल्यांचे पाणी या ठिकाणी जमा झाल्यास दुर्गंधी पसरू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी काम होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
महामार्ग प्राधीकरणचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे आहे. मात्र येथील विभागाचे बांधकामावर कोणतेच नियंत्रण नाही. गडचिरोली विभागाचा प्रभार नागपूर येथील अधीक्षक अभियंता मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन विभागाचा कारभार असल्याने तेही गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे काम केले जात आहे. मागील दोन महिन्यांपासून गडचिरोली शहरात वाहतुकीची कोंडी होत असताना बांधकाम विभागाला याबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.