कोरोनाबळी ठरलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर नोकरीत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:44+5:302021-08-29T04:34:44+5:30

माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन स्वीकारले. जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती व मान्यतेचा प्रश्न ताबडतोब सोडवावा, ...

Employ the heirs of the coronated teachers-staff on compassionate grounds | कोरोनाबळी ठरलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर नोकरीत घ्या

कोरोनाबळी ठरलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर नोकरीत घ्या

Next

माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन स्वीकारले. जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती व मान्यतेचा प्रश्न ताबडतोब सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.

राज्यातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यासह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थान यंत्रणेमार्फत शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या सेवा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या पथकामध्ये शिक्षकांनीही कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावले. अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण होऊन शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे जीव गेले आहेत. पोलीस विभागातील कर्तव्य बजावत असताना व कोरोना लागण झालेल्या २४५ पीडित कुटुंबांना ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत प्रत्येकी पन्नास लक्ष सानुग्रह अनुदान गृहविभाग राज्य शासनाने मंजूर केले. त्या तुलनेत राज्यात फक्त एका शिक्षकाच्या कुटुंबाला लाभ देण्यात आलेला ही वस्तुस्थिती आहे.

कोरोनायोद्धे, मृत शिक्षक दीपक सोमनकर यांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देऊन त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घेण्यात यावे, शाळेत पाठविण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांना दुसऱ्या शाळांच्या आस्थापनावर पाठवावे, मृत शिक्षक संजय चुधरी यांची पत्नी दोशिला संजय चुधरी यांना विद्याभारती कन्या विद्यालय गडचिरोली येथे विनाअट नोकरीत सामावून घेण्याची मागणी खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शुक्रवारला शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमाेर दुपारी २ ते ३ या वेळेत पीडित कुटुंबासह धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात आले.

हे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्य.) राजकुमार पी निकम, गडचिरोली यांनी स्वीकारले आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना पाठविण्याचे मान्य केले. दीपक सोमनकर यांचे वैद्यकीय देयक, त्यांच्या पेंशन प्रकरणाबाबत चर्चा झाली.

निवेदन देताना खासगी प्राथमिक संघाचे प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, तेजराज राजूरकर, आरिफ शेख, संजय गोहोकर, डी. आर. चौधरी, अशोक भजने, सुधाकर लाकडे, पी. डी. बोळणे, एम. डी. प्रधान, पंकज भोगेवार, कृणाल पडलवार, प्रमोद समर्थ तसेच पीडित कुटुंबातील सदस्य रंजना दीपक सोमनकर, दोशिला संजय चुधरी आदी उपस्थित होते.

(बॉक्स)

अशा आहेत मागण्या

दि.३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांची वरिष्ठ व निवडश्रेणीतून त्यांना सूट दिल्यामुळे तातडीने निकाली काढावी, बोमनवार हायस्कूल चार्मोशी यांचे माहे जुलैचे वेतन मुख्याध्यापक वेतनवाढीवर संस्थेतील वादामुळे व सचिव/ अध्यक्ष स्वाक्षरी नसल्यामुळे झालेले नाही, त्यांचे वेतन ताबडतोब करावे, १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी यांचेकडे सुधारित अंश राशीकरानाचे अर्ज मागवावे, हा शासन निर्णय व त्या लाभाची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ असल्याचे शाळा व सेवानिवृत्त यांच्या ध्यानात आणावे, अशी विनंती संघटनेव्दारे करण्यात आली.

(बाॅक्स)

शिक्षकदिनी निषेध मोर्चा काढणार

कोरोना आजाराने मृत पावलेल्या कुटुंबाचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम यांनी स्वीकारून अनुकंपा नोकरीसाठी संस्थेस तत्काळ आदेश दिले. स्व. संजय चुधरी यांच्या पत्नीला मिळणारी जीपीएफची रक्कम व अधीक्षक वेतनपथक यांच्या चुकीच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला. रविवारला ५ सप्टेंबर राेजी ‘शिक्षक दिनी’ नागपूर येथे यशवंत स्टेडियम ते संविधान चौक निषेध मोर्चा काढण्याचे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Employ the heirs of the coronated teachers-staff on compassionate grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.