मानापूर पं.स.निवडणुकीच्या मतदानासाठी कर्मचारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 10:55 PM2018-04-04T22:55:52+5:302018-04-04T22:55:52+5:30
मानापूर गणाची पोटनिवडणूक ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली असून काही पोलिंग पार्ट्या ४ एप्रिल रोजीच रवाना करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : मानापूर गणाची पोटनिवडणूक ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली असून काही पोलिंग पार्ट्या ४ एप्रिल रोजीच रवाना करण्यात आल्या.
मानापूर गणाच्या सदस्या नर्मदा तुळशिदास काशिकर यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी ६ एप्रिल रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. भाजपाकडून उत्तराबाई प्रेमानंद लोनबले या उभ्या आहेत. त्या मानापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने देलनवाडी येथील किरण बंडू मस्के यांना उमेदवारी दिली आहे. या गणात एकूण ५ हजार १३० मतदार आहेत. पोटनिवडणूक असल्याने दोन्ही राजकीय पक्षांनी या निवडणुकीकडे लक्ष घातले आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासूनच छुप्या प्रचाराला सुरुवात झाली. मात्र नामांकन अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला. दोन्ही राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी गावागावात जाऊन प्रचार केला. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रंगत आली. स्थानिक कार्यकर्त्यांनीही प्रचारामध्ये स्वत:ला झोकून दिले.
या गणाची ६ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. यासाठी तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. एकूण १० मतदान केंद्र आहेत. मानापूर गणातील भाकरोंडी व कुलकुलीचा परिसर नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या गावांजवळ कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्र असल्याने या पोलीस मदत केंद्राला बेस कॅम्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाकरोंडीसाठी दोन पोलिंग पार्ट्या व कुलकुलीसाठी दोन पोलिंग पार्ट्या अशा एकूण चार पोलिंग पार्ट्या बुधवारी आरमोरी तहसील कार्यालयातून रवाना झाल्या. या पार्ट्या गुरूवारी सकाळी मालेवाडा पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. उर्वरित सहा निवडणूक पथके गुरूवारी तहसील कार्यालयातून रवाना होतील, अशी माहिती आरमोरीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत धाईत यांनी लोकमतशी बोलताना दिली. सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तहसीलदार यशवंत धाईत नायब तहसीलदार पित्तुलवार, झोनल अधिकारी कटरे यांच्या नियंत्रणात सर्व निवडणूक यंत्रे तपासण्यात आले. सर्व कर्मचाºयांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
निकालावर आरमोरी पंचायत समिती सभापतींचे भवितव्य
वैरागड - आरमोरी पंचायत समितीची एकूण आठ सदस्य संख्या आहे. यापूर्वी काँग्रेसचे संख्याबळ चार होते. शिवसेनेच्या एका सदस्याला सोबत घेऊन काँग्रेसच्या बबीता उसेंडी या सभापती झाल्या. मात्र काँग्रेसच्या पं.स. सदस्य उमेदवार काशिकर यांचे निधन झाले. त्यामुळे आता काँग्रेसचे संख्याबळ तीन एवढे झाले आहे. शिवसेनेचा एक सदस्य पकडला तरी एकूण संख्याबळ चारच होते. जर समजा या जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, तर विद्यमान सभापतींच्या पदाला कोणताही धोका नाही. मात्र भाजपाचा उमेदवार निवडून आल्यास काँग्रेसपेक्षा भाजपाचे संख्याबळ अधिक होते. भाजपाचे संख्याबळ चारपर्यंत पोहोचते. मात्र भाजपाकडेही स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला पूर्वीप्रमाणेच उपसभापती पद देऊन विद्यमान सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींमुळे मानापूर पं.स. गणाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. मानापूर पं.स. गणात देलनवाडी, मानापूर, भाकरोंडी या चार ग्रामपंचायती येतात. या ग्रामपंचायतीमध्ये कोसरी, नागरवाही, चव्हेला, मांगदा, कुलकुली, चुड्याल, नवरगाव, देवखडकी, बाजीराव टोला या गावांचा समावेश आहे.