कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले

By admin | Published: July 14, 2017 02:17 AM2017-07-14T02:17:52+5:302017-07-14T02:17:52+5:30

तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही

Employees' adjustment halted | कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले

कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले

Next

असुरक्षिततेची भावना : आकृतीबंध तयार केला मात्र भरतीचा पत्ता नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीत समायोजन करण्यात आले नाही. समायोजन तत्काळ करावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आरमोरी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत केले. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी शासनाने यादी मागितली होती. त्यानुसार शासनाला माहिती पुरविण्यात आली. ५ जुलै २०१६ रोजी नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. यास आता एक वर्षाचा कालावधी झाला असतानाही पदभरती झाली नाही. त्यामुळे आकृतीबंध तयार होऊन एक वर्षांचा कालावधी उलटून नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले आहे. त्यांच्या समायोजनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यांना वेतनश्रेणीसुद्धा लागू झाली नाही. या कर्मचाऱ्यांना नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, अशी मागणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. असुरक्षिततेची भावना असल्याने याचा विपरित परिणाम कामावर पडत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे नगर विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापूर्वी नगर पंचायत कार्यालयात पदभरती होणे गरजेचे आहे.

Web Title: Employees' adjustment halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.