कर्मचाऱ्यांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:45 AM2018-03-24T01:45:35+5:302018-03-24T01:45:35+5:30
पंधरवड्यात जनजागृती : भामरागड तालुका आरोग्य कार्यालयात मौखिक आरोग्य दिन
ऑनलाईन लोकमत
भामरागड : तंबाखू सेवनाने शरीरावर वाईट परिणाम होतात हे एकीकडे सांगायचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्याच तोंडात खर्रा असणार हे चित्र आता बदलेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. आरोग्य कार्यालये व आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी तंबाखूमुक्त व्हावे यासाठी जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले व यावेळी कर्मचाºयांनीही तंबाखू सेवन न करण्याचा संकल्प केला.
भामरागड येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ. नंदू मेश्राम यांनी कोटपा कायदा, अन्न व औषध प्रश्न कायदा, बाल संरक्षण कायदा व सर्व कार्यालयांना तंबाखूमुक्त आशयाचे दर्शक फलक लावण्याबाबत सांगितले. आरोग्य कर्मचाºयांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
यावेळी आशा, आशा प्रवर्तक, नर्स, भामरागडच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले. खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे जिल्ह्यातील प्रमाण अधिक आहे. परंतु कर्करोगाच्या प्राथमिक स्वरूपातील लक्षणे असलेली अनेक रूग्ण भामरागड तालुक्यात आढळल्याचे निरीक्षनांती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, इतरांनाही या व्यसनापासून परावृत्त करावे, असे आवाहन जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
२० मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत पंधरवडा जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी डॉ. मिलिंद मेश्राम, भैसारे, मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण व वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.