कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला
By admin | Published: February 7, 2016 02:16 AM2016-02-07T02:16:44+5:302016-02-07T02:16:44+5:30
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ....
निवेदन दिले : २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो कर्मचाऱ्यांनी नारेबाजी करून जिल्हा कचेरीवर धडक दिली.
कर्मचाऱ्यांचा सदर मोर्चा दुपारी २ वाजता येथील इंदिरा गांधी चौकातून चंद्रपूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गदर्शन सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर ताशेरे ओढले. या मोर्चाचे नेतृत्व पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, चिटणीस शैलेश राऊत, राज्य समन्वयक दशरथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश मैलारे, बापू मुनघाटे, महिला संघटिका वनश्री जाधव यांनी केले.
कुठल्याही कर्मचाऱ्यांना एनपीएसचे अर्ज भरण्याची सक्ती करू नये, कर्मचाऱ्यांची एनपीएस व डीसीपीएस हप्ते कपातीची कार्यवाही बंद करावी, कपात झालेल्या रकमेचा हिशोब नियमित द्यावा व मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ तत्काळ द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व (माध्यमिक), जिल्हा कोषागार अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, मुख्य वनसंरक्षक व प्रकल्प अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. या मोर्चात प्रशांत दीडसे, कैलाश कोरोटे, किशोर मोदक, ज्ञानेश्वर हाडोळीकर, शिवाजी जाधव, विकास दोडके, शरद भेंडारे, सतीश खाटेकर, धनराज मोगरकर, त्रिमूर्ती भिसे, सुधाकर वेलादी, संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर बाजोड, गणेश आखाडे, नीलेश शेंडे, विठ्ठल होंडे, मोहन देवकते, राजेश्वर पदा, दीपक पुंगाटी, अशोक बोरकुटे, जितेंद्र कोहळे, सुधाकर दुर्वा, हिवराज बनकर, संदीप गराटे आदीसह वन, शिक्षण, आरोग्य, पंचायत, महसूल, बांधकाम, समाज कल्याण व खासगी संस्थांमध्ये कार्यरत जवळपास दीड हजार कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)