मुख्यमंत्री प्रशिक्षण शिबिरातून बेरोजगारांना रोजगार; १३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना मिळाली नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:32 PM2024-08-27T15:32:05+5:302024-08-27T15:33:01+5:30
Gadchiroli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे यशस्वी आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिबिराचे आयोजन २४ ऑगस्ट रोजी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. या शिबिरातून बेरोजगारांना रोजगार प्राप्त होत आहे. यावेळी उपस्थित १३९ उमेदवारांपैकी ५४ जणांना नियुक्ती मिळाली.
या मेळाव्याला पदवीधर शिक्षक / प्राथमिक शिक्षक व डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता पात्र उमेदवारास बोलावण्यात आले. या शिबिराला पदवीधर शिक्षक २९, प्राथमिक शिक्षक ९५ व डाटा एन्ट्री ऑपरेटर ४४ असे एकूण १३९ उमेदवार उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांमधून शिबिराला पदवीधर शिक्षक २०, प्राथमिक शिक्षक २७ व डाटा एन्ट्री ऑपरेटर ७ असे एकूण ५४ पात्र झालेले आहेत. कोरची तालुक्यात प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणार्थी ६६ जागा रिक्त असून या रिक्त जागेसाठी सुशिक्षित बेरोजगार अध्यापक पदविका उमेदवारांनी ३१ ऑगस्टपर्यंत पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावे, असे गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी यावेळी सूचित केले.
गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी उपस्थित उमेदवारास भरती प्रक्रियेचे निकष, नियुक्ती कुठे व इतर बाबीवर मार्गदर्शन केले. शिबिराला विषयतज्ज्ञ शिवाजी वाघमारे, साधन व्यक्ती विनायक लिंगायत, साधन व्यक्ती प्रमोद वाढणकर, मीना शहारे, रोशना बावनकुळे, साधन व्यक्ती योगेंद्र शुक्ला, युवराज मोहनकर, कुणाल कोचे, फामेश्वर नाटके हजर होते.
कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करा
- ग्रामीण भागातील युवक- युवतींनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करावी. कौशल्यपूर्ण शिक्षणातून स्वयंरोजगारही उभारता येतो, असे मान्यवरांनी सांगितले.
- अलिकडे उद्योगाला कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण न घेता कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे आवाहन केले.