१३ हजार मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:14 AM2018-01-05T00:14:53+5:302018-01-05T00:15:05+5:30

Employment of 13 thousand laborers | १३ हजार मजुरांना रोजगार

१३ हजार मजुरांना रोजगार

Next
ठळक मुद्देदर दिवशी मजूरसंख्येत वाढ : १९२ ग्रामपंचायतीमार्फत रोहयोची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने वाढत आहे. सध्यास्थितीत १३ हजारवर मजुरांना रोहयोच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती जि. प. नरेगाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १९२ ग्राम पंचायतीमार्फत सिंचन विहीर, शेततळे, तलाव खोलीकरण व इतर कामे सुरू आहेत. यंत्रणा स्तरावरही अनेक कामे सुरू आहेत. ग्राम पंचायत व यंत्रणा स्तरावरील मिळून सध्या १३ हजारवर मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहेत.
ग्राम पंचायत स्तरावरील कामांवर सध्यास्थितीत ६ हजार २७८ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील कामांवर ३६९, धानोरा ९५३, चामोर्शी ६६८, मुलचेरा १ हजार ४८, देसाईगंज ७१, आरमोरी ६३७, कुरखेडा ५७५, कोरची ९८३, अहेरी २९४, एटापल्ली १११, भामरागड ३२८ व सिरोंचा तालुक्यातील कामांवर १८१ मजुरांची उपस्थिती आहे. काम सुरू नसलेल्या भागांमधील अनेक नोंदणीकृत मजुरांच्या हाताला काम नसल्याने रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.
पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीन
रोजगार हमी योजनेच्या कामाचा आराखडा ग्राम पंचायत स्तरावर तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडे कामांची यादी पाठवून कामे मंजूर करण्याचा प्रस्ताव पाठविला जातो. ही सर्व प्रक्रिया पार पाडून बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये नरेगाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र नव्या वर्षातील जानेवारी महिना येऊनही अनेक ग्राम पंचायतींनी संबंधित गावात मंजूर असलेली रोहयोची कामे सुरूच केली नाही. अशा ग्राम पंचायतीची संख्या पावणे तीनशेच्या आसपास आहे. मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्यात या पावणे तीनशे ग्राम पंचायती उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या गावातील शेकडो नोंदणीकृत मजूर रिकाम्या हाताने पडून आहेत.

Web Title: Employment of 13 thousand laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.