मुक्त विद्यापीठामुळे नोकरी व शिक्षणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:03 AM2018-08-24T00:03:55+5:302018-08-24T00:05:33+5:30
मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय करण्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध होते. त्यामुळे दिवसेंदिवस मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा.अनिल सोले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय करण्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध होते. त्यामुळे दिवसेंदिवस मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा.अनिल सोले यांनी केले.
गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या नागपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील अभ्यास केंद्रातून २०१७ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी बुधवारी पदवीवितरण समारंभाचे आयोजन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या समारंभाला प्रा.अनिल सोले प्रमुख मार्गदर्शक होते. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ.नारायण मेहरे, प्राचार्य डॉ.बी.एस. चिकटे, केंद्र संयोजक डॉ. आर.पी.करोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.मेहरे यांनी प्रास्ताविकातून यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या उभारणीपासून तर आजतागायत सविस्तर माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली, त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमाणे आपले जीवन समाजाच्या कामी लावावे, असे मार्गदर्शन केले. समारंभाचे आयोजन प्राचार्य डॉ.चिकटे यांनी आपल्या भाषणादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठा केंद्र शिवाजी महाविद्यालयात आहे. मुक्त विद्यापीठामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या विद्यापीठाची पदवी मिळवून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, असे मार्गदर्शन केले.
प्र-कुलगुरू डॉ.भुसारी यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. आदिवासी, ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, रोजगार करणाऱ्या विद्यार्थ्यालाही शिक्षण घेता यावे, असा आग्रह यशवंत चव्हाण यांचा होता. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले, असे मार्गदर्शन केले.
संचालन प्रा.रेवनदास शेडमाके तर आभार नागपूर विभागाचे अमोल पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ.आर.पी.करोडकर, तसेच केंद्र सहायक प्रवीण मस्के यांनी सहकार्य केले. समारंभात २५० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले.