एकाच दिवशी ८२४ बेरोजगारांना नोकरीचे नियुक्तीपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:07 AM2018-01-06T00:07:01+5:302018-01-06T00:07:12+5:30

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पोलीस दलातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन गडचिरोलीत केले होते.

 Employment appointment to 824 unemployed on same day! | एकाच दिवशी ८२४ बेरोजगारांना नोकरीचे नियुक्तीपत्र!

एकाच दिवशी ८२४ बेरोजगारांना नोकरीचे नियुक्तीपत्र!

Next
ठळक मुद्देपोलीस दलाचा रोजगार मेळावा : २२ कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती, नक्षलग्रस्त भागातील बेरोजगारांची एकच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पोलीस दलातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन गडचिरोलीत केले होते. या मेळाव्यात ४ हजारांवर युवकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे ४२०० बेरोजगारांच्या मुलाखती घेऊन त्यापैकी ८२४ जणांना तत्काळ नियुक्तीपत्रही देण्यात आले.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक टी. शेखर होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (नक्षल अभियान) डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी (नक्षल क्राईम), एसडीपीओ डॉ.सागर कवडे, गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक संजय सांगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपमहानिरीक्षक शिंदे यांनी नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील युवकांना या मेळाव्यामुळे रोजगाराची संधी मिळणार असल्याचे सांगून यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. टी.शेखर यांनी जिल्ह्याच्या विकासात हा मेळावा मैलाचा दगड ठरेल, असे सांगितले.
संमेलनात विविध ठिकाणच्या २२ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. युवकांना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह अर्ज भरणे आणि जमा करणे सोपे जावे यासाठी वेगवेगळे काऊंटर लावण्यात आले होते. वेरोजगारांना नोकरीच्या विविध संधींबाबत माहितीही देण्यात आली. याशिवाय पोलीस भरतीसंदर्भातील पात्रता आणि तयारी यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. निमंत्रितांपैकी जिल्हाधिकारी शेखर सिंग हे दिल्लीत असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. मात्र जि.प.चे सीईओ शांतनू गोयल व सहा. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली.
सकाळपासून लागल्या बेरोजगारांच्या रांगा
या रोजगार मेळाव्यासाठी सकाळच्या थंडीत कुडकुडत कार्यक्रमस्थळ असलेल्या आरमोरी मार्गावरील सांस्कृतिक भवनाबाहेर नाव नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी वेगवेगळे काऊंटर लावल्यामुळे गर्दीतही काम सुकर झाले. विशेष म्हणजे मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही सुविधा त्याच ठिकाणी केली असल्यामुळे नियुक्तीपत्र देणे शक्य झाले.
सात युवकांना अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र
या मेळाव्यात विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीनंतर निवड झालेल्या ७ उमेदवारांना प्रतिनिधीक स्वरूपात अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात प्रशांत दिवाकर रा.दिघोरी, शैलेंद्र गजबे, योगिता खोब्रागडे, कुणाल म्हशाखेत्री, नंदलाल मस्के, वैभव देशपांडे आणि विकास सहारे यांचा समावेश होता. लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याने त्या बेरोजगारांचा आनंद गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे ६४८ उमेदवारांना नोकरीसाठी प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले. त्यांना आवश्यकतेनुसार नियुक्ती मिळणार आहे. औद्योगिक विकासात मागे असलेल्या या जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी ही सुवर्णसंधी ठरली.

Web Title:  Employment appointment to 824 unemployed on same day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.