निधीअभावी रोजगार हमीची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:20 AM2018-02-05T00:20:02+5:302018-02-05T00:20:38+5:30
मागील चार महिन्यांपासून कुशल कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे अकुशल कामांचाही निधी मिळाला नाही.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : मागील चार महिन्यांपासून कुशल कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे अकुशल कामांचाही निधी मिळाला नाही.
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. जेमतेम शेतीच्या भरवशावर चार महिने रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीचा हंगाम संपताच रोहयो कामांची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. रोहयोच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच विकासाचीही कामेही होतात. रोहयोचा निधी खर्च करताना ४० टक्के कुशल व ६० टक्के अकुशल हे प्रमाण जिल्हास्तरावर पाळणे आवश्यक आहे. अकुशल कामे मजुरांच्या माध्यमातून केली जातात. मजुरांचा प्रपंच दैनंदिन मिळणाऱ्या मजुरीवर अवलंबून राहतो. त्यामुळे आठवडा संपताच त्यांना मजुरी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासन अकुशल कामाचा निधी कधीच कमी पडू देत नाही. पंचायत समिती स्तरावरून सॉफ्टवेअरमध्ये एन्ट्री केल्याबरोबर संबंधित मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. मात्र प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मस्टर बनविण्यास तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिकबाबी पूर्ण करण्यास उशिर करतात. त्यांच्या चुकीमुळेच रोहयो मजुरांची मजुरी थकते. सध्यास्थितीत १ कोटी ५३ लाख २५ हजार रूपये मजुरी थकली आहे.
रोहयोच्या माध्यमातून मजगी, बोडी, शेततळे, सिंचन विहीर, सिमेंट बंधारा, खोदतळे, वर्मी, कंपोस्ट, पांदन रस्ते आदी कामे केली जातात. ही कामे करण्यासाठी साहित्याची गरज भासते. सदर साहित्य ग्राम पंचायत आपल्या स्तरावर खरेदी करते. याला रोहयोच्या भाषेत अकुशल निधी असे संबोधल्या जाते. अकुशल निधीचा मात्र मागील दोन वर्षांपासून सातत्त्याने तुटवडा पडतो.
चालू आर्थिक वर्षातही मागील चार महिन्यांपासून कुशल कामांचा निधी उपलब्ध झाला नाही. सुमारे ६ कोटी ८० लाख ७२ हजार रूपयांचा निधी थकला आहे. कुशलचा निधी मिळत नसल्याने याचा परिणाम अकुशल कामावरही होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार महिन्यांपासून जिल्हाभरातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. धानाचा हंगाम संपला असल्याने मजूरवर्ग रोहयोच्या कामांच्या प्रतीक्षेत आहे. ेकामे ठप्प असल्याने रोजगारासाठी वनवन करावी लागत आहे.
चार महिन्यांपासून ५ कोटींचा कुशल निधी थकला
रोजगार हमी योजनेत अकुशल निधीचा अपवाद वगळता कधीच टंचाई जाणवत नाही. मात्र कुशल निधी बºयाच वेळा उपलब्ध होत नाही. मागील चार महिन्यांपासून कुशल कामांचा निधी उपलब्ध झाला नाही. सुमारे ५ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांचा निधी थकला आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात ५१ लाख २४ हजार, आरमोरी तालुक्यातील १५ लाख ६५ हजार, भामरागड तालुक्यातील १३ लाख ६६ हजार, चामोर्शी तालुक्यातील २६ लाख ७१ हजार, देसाईगंज तालुक्यातील ४३ लाख ६५ हजार, धानोरा तालुक्यातील ८४ लाख ६२ हजार, एटापल्ली तालुक्यातील ११ लाख ५४ हजार, गडचिरोली ४० लाख १५ हजार, कोरची ५८ लाख ७४ हजार कुरखेडा ७९ लाख ४ हजार, मुलचेरा १९ लाख ६५ हजार व सिरोंचा तालुक्यातील ७८ लाख १३ हजार रूपयांचा निधी रखडला आहे.