दीड हजारावर मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:00 AM2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:09+5:30
आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या योजनेतून दिली जात असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याची प्रतिक्रिया बीडीओ श्रावण सलाम यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज :लॉकडाऊनमुळे शेतमजूर, भूमिहीन, मजूर व हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या घटकाला दिलासा देण्यासाठी जि. प. द्वारे देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रा. पं. स्तरावरील एकूण १८ कामांना सुरूवात झाली आहे. तालुक्यातील आठ ग्रा. पं. अंतर्गत एकूण १ हजार ६४७ मजुरांना रोजगार मिळाला आहे.
देसाईगंज पं. स. अंतर्गत एकूण २० ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यापैकी आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या योजनेतून दिली जात असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याची प्रतिक्रिया बीडीओ श्रावण सलाम यांनी दिली.
बीडीओंची कामावर भेट
देसाईगंजचे बीडीओ श्रावण सलाम यांनी रोजगार हमीच्या कामावर प्रत्यक्ष भेट देऊन मजुरांना योग्य शारीरिक अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, तोंडावर रुमाल अथवा मास्क लावणे याबाबत आवाहन केले. तसेच मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. हात धुण्यासाठी मजुरांना साबन पुरविली जात असल्याची माहिती देत उर्वरित १२ ग्रा. पं. मध्ये रोहयोचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.