रोहयोतून ४७ कोटींचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:54 PM2018-11-01T23:54:02+5:302018-11-01T23:55:07+5:30

२०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर अवलंबून राहतात.

Employment of Rs 47 crores from Roho | रोहयोतून ४७ कोटींचा रोजगार

रोहयोतून ४७ कोटींचा रोजगार

Next
ठळक मुद्देसात महिन्यांतील स्थिती : इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१८-१९ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगाराचे शेती व्यतीरिक्त दुसरे साधन नसल्याने येथील बहुतांश मजूर शेती व शेतीवर आधारित रोजगारावर तसेच रोहयो कामांवर अवलंबून राहतात. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात रोहयो कामांची मागणी अधिक आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. या कालावधीत येथील मजुरांना शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्यांचे रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर तेंदूपत्ता व बांबू कटाईच्या माध्यमातून जवळपास एखादी महिन्याचा रोजगार उपलब्ध होतो. हा कालावधी सोडला तर इतर कालावधीत रोजगारच उपलब्ध होत नाही. त्यातही दुर्गम व ग्रामीण भागात रोजगाराची समस्या गंभीर आहे. परिणामी या गावातील मजूर तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात रोजगारासाठी भटकंती करतात. तर काही मजूर मात्र गावातच रोहयोच्या कामावर जातात.
रोजगार हमी योजनेच्या कायद्यात एखाद्या मजुराने कामाची मागणी करूनही त्याला रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायती व विभाग अगोदरच कामांना मंजुरी घेऊन ठेवतात. धानाचा हंगाम संपल्यानंतर रोहयोच्या कामांना सुरुवात केली जाते. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत सुमारे ४७ कोटी ३९ लाख रूपयांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. तेवढी मजुरी मजुरांना देण्यात आली आहे. रोहयोच्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याने बेरोजगारीचे संकट कमी होण्यास मदत होते.
एक महिन्यानंतर मागणी वाढणार
धान कापणीच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे. धान शेतीच्या माध्यमातून जवळपास पुन्हा एखादी महिना रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगारासाठी मजुरांना वनवन भटकावे लागते. या कालावधीत ग्रामपंचायती व इतर विभाग रोजगार हमीची कामे सुरू करतात. विशेष करून धानाच्या बांध्या तयार करणे, बंधारे बांधणे, कालवे दुरूस्त करणे आदी कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात. धान शेती निघल्यानंतर या कामांना वेग येणार आहे. शेतीची कामे संपत असल्याने रिकामा राहण्यापेक्षा मजूर रोहयो कामांना पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते.
९० टक्के मजुरांना वेळेवर मजुरी
रोजगार हमी योजनेच्या कायद्यानुसार कामाची मजुरी १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. संवर्ग विकास अधिकाऱ्यांना मस्टरला मान्यता दिल्यानंतर सरळ पैसे मजुराच्या बँक खात्यात जमा होतात. अकुशल कामासाठी रोहयो विभागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. त्यामुळे मस्टरची प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर पैसे जमा होतात. १५ दिवस उलटूनही मजुरी जमा होण्यास विलंब होत असल्यास संबंधित मजुराला व्याज द्यावी लागते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात वेळेवर मजुरी मिळण्याचे प्रमाण एकूण मजुरांच्या ८९.४२ टक्के एवढे आहे. काही तांत्रिक कारणांमुळे जवळपास १० टक्के मजुरांना रोहयो मजुरी वेळेवर मिळत नाही.

Web Title: Employment of Rs 47 crores from Roho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.