आर्थिक दुर्बलतेमुळे बालकांनाही राेजगाराची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:59+5:302021-03-08T04:33:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अंकिसा : लहान मुले दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीची प्रतीक्षा करीत असतात. शाळेला सुट्टी लागताच अभ्यासाचा तणाव ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : लहान मुले दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीची प्रतीक्षा करीत असतात. शाळेला सुट्टी लागताच अभ्यासाचा तणाव विसरून खेळणे-बागडण्यात वेळ घालवण्याची त्यांना हाैस असते. नातेवाइकांच्या गावाला जाऊन मनसाेक्त आनंद घेण्याची त्यांना ओढ असते. परंतु हे सर्व प्रत्येक मुले करू शकत नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असताना राेजगार शाेधावा लागताे, ही समस्या अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. अंकिसा परिसरात आर्थिक दुर्बलतेमुळे, बालकांनाही राेजगाराची चिंता सतावत असून त्यांना बालपण विसरून मजुरीला जावे लागत आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी नातेवाइकांच्या गावाला जातात. मागील वर्षीपासून काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. सध्या पाचवीपासून महाविद्यालयीन वर्ग सुरू आहेत. परंतु इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग अद्यापही बंद आहेत. अशा स्थितीत मुलेसुद्धा कंटाळतात. काेराेनामुळे पिकनिक, सहलीला व दूरवर नातेवाइकांच्या गावाला जाऊ शकत नाही. आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले पालक पाल्यांवर बराच पैसा खर्च करून त्यांना साेयी-सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु ज्या पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे, असे पालक स्वत: राेजगारासाठी भटकतात. साेबत आपल्या पाल्यानांही घेऊन जातात. त्यामुळे पालकांसह मुलांनाही राेजगाराचा शाेध असताे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ओढवलेल्या मजुरीच्या कामामुळे त्यांना बालपणाचा विसर पडून राेजगाराची चिंता अधिक सतावत असते.
बाॅक्स
पायाला चटके; मात्र चेहऱ्यावर आनंद
जिल्ह्याच्या अनेक भागात बालमजुरांची समस्या दिसून येते. अंकिसा परिसरात सुट्टीच्या दिवसात मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावणारी अनेक मुले दिसून येतात. उन्हाचे चटके लागत असले तरी पालक व पाल्य या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद मात्र दिसून येताे. काही मुलांच्या पायात चप्पल व अंगात पुरेशे कपडे दिसून येत नाही. कधी आजाराने ग्रासले तरी दु:ख विसरून कामे करणारी अनेक बालके दिसून येतात.