शेकडो तेंदू मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:46+5:30
व्यंकटापूर ग्राम पंचायतीच्या वतीने तेंदू घटकाच्या लिलाव प्रक्रियेसाठी वृत्तपत्रात रितसर जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पेसा अधिनियम व शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अनुसरून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. ग्राम पंचायतीचे प्रशासक जी. व्ही माकडे यांच्या अध्यक्षतेखाली कोष समितीचे सदस्य, साधन संपत्ती व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लिलाव प्रक्रियेला दोन कंत्राटदारांनी सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्याच्या व्यंकटापूर परिसरात ग्रामसभांच्या वतीने लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू संकलनाचे काम सुरू करण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सदर हंगामातून व्यंकटापूर येथील ४८ व परिसरातील शेकडो तेंदू मजुरांना रोजगार मिळाला आहे.
व्यंकटापूर ग्राम पंचायतीच्या वतीने तेंदू घटकाच्या लिलाव प्रक्रियेसाठी वृत्तपत्रात रितसर जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पेसा अधिनियम व शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अनुसरून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. ग्राम पंचायतीचे प्रशासक जी. व्ही माकडे यांच्या अध्यक्षतेखाली कोष समितीचे सदस्य, साधन संपत्ती व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लिलाव प्रक्रियेला दोन कंत्राटदारांनी सहभाग घेतला. ९६२ गोणी तेंदूपत्त्याचे संकलन करण्यात येणार असून प्रति गोणी ४ हजार रूपये असा भाव एका कंत्राटदाराने बोलीत बोलला तर दुसऱ्या कंत्राटदाराने ५ हजार ६०० रूपयांची बोली लावली. नियमानुसार ५ हजार ६०० रूपये बोली बोलणाऱ्या कंत्राटदाराला हा कंत्राट देण्यात आला. प्रति पुडा ५ रूपये ६० पैशानुसार तेंदूपत्याचे संकलन सुरू आहे.
फडीवर मजूर व हमालांना मास्क वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगचेही पालन केले जात असल्याची माहिती प्रशासक माकडे व सचिव रंजित राठोड यांनी दिली आहे. व्यंकटापूर, बामणी, ग्लासफोर्डपेठा, वेनलय्या आदी गावातही तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या नियंत्रणात तेंदू हंगाम सुरू आहे.
संचारबंदीत आधार
कोरोना संचारबंदीमुळे व्यंकटापूरसह सिरोंचा तालुक्यातील कामधंदे बंद असल्याने मजुरांचे हात रिकामे होते. ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने तेंदू संकलनाचे काम सुरू करण्यात आल्याने मजुरांना रोजगार प्राप्त होऊन दिलासा मिळाला आहे.