उच्च शिक्षणासाठी मुलांना प्रेरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:21 AM2018-01-20T01:21:17+5:302018-01-20T01:21:33+5:30
केवळ नोकरी मिळविणे एवढेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पालकांनी दिशादर्शकाची भूमिका पार पाडावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : केवळ नोकरी मिळविणे एवढेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पालकांनी दिशादर्शकाची भूमिका पार पाडावी. आपल्या पाल्यांना वाम मार्गाने जाऊ न देता त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिले.
कुरखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या मोहगाव (मेंढा) येथे गुरूवारी आयोजित जनजागरण मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन सोनेरांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सोड यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून तंमुस अध्यक्ष हरबाजी शेंडे, माजी सरपंच जगन मडावी, कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. तोडुलवार, डॉ. चुनारकर, डॉ. वट्टी, डॉ. हलामी, ग्रा.पं. सदस्य माधव दहिकर, वर्षा राऊत, रामदास हलामी, डोमा प्रधान, मंसाराम मडावी व परिसरातील सर्व गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते. मेळाव्यात प्रौंढांची कबड्डी स्पर्धा व व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्यसनमुक्तीवर आधारीत समाज प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परिसरातील गरीब, गरजू कुटुंबांना पोलीस विभागाच्या वतीने स्वयंपाकाच्या भांड्यांचे वितरण करण्यात आले. मेळाव्यादरम्यान शासनाच्या विविध विभागामार्फत राबविल्या जाणाºया जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. संचालन मनोहर मडावी, प्रास्ताविक माजी सरपंच जगन मडावी तर आभार पोलीस पाटील हलामी यांनी मानले.
२४ ला पोलीस पाटील दिनाचे आयोजन
महाराष्टÑ राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना तालुका शाखा कुरखेडा-कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा येथे बुधवार २४ जानेवारीला दुपारी १२ वाजता पोलीस पाटील दिन राजीव भवनात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष भृंगराज परशुरामकर, तहसीलदार अजय चरडे, तहसीलदार पुष्ष्पा कुमरे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, शरद ब्राह्मणवाडे, ठाणेदार योगेश घाडे, उमेश महाले, दीपक वारे, अतुल तवाडे, ढेकणे, मुरारी दहिकर, अनिल कोठारे उपस्थित राहणार आहेत.