दुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:21+5:302021-04-30T04:46:21+5:30
तसेच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असून, बाधित रुग्णांना योग्य औषधोपचार करून कोरोनावर मात करण्याचे निर्देशही खा. ...
तसेच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असून, बाधित रुग्णांना योग्य औषधोपचार करून कोरोनावर मात करण्याचे निर्देशही खा. नेते यांनी दिले. तहसील कार्यालय अहेरीच्या सभागृहात अहेरी तालुक्यातील कोविड स्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
आढावा बैठकीला भाजपच्या ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबूराव कोहळे, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, अहेरी तालुका महामंत्री पोशालू चुधरी, महिला आघाडीच्या रहिमा सिद्धीकी, पौर्णिमा इष्टाम, तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधीक्षक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
कोविडबाधित २८९ रुग्ण असून, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार ओतारी यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगितले असता खासदार अशोक नेते यांनी औषधीसाठी वरिष्ठांना सूचना देणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन व मिनी व्हेंटिलेटर अहेरी तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कोरोनाबाधित व विलगीकरणातील रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी खा. अशोक नेते यांनी दिले. बैठकीला अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.