मामा तलावाच्या माेजणीमुळे अतिक्रमणधारक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:56+5:302021-03-05T04:36:56+5:30
आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे ...
आलापल्ली गावालगत असलेल्या मामा तलावात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता घटली आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी तलावाची मोजणी करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी तलावाच्या मोजणीला सुरुवात झाली. एकेकाळी आलापल्लीची शान समजल्या जाणाऱ्या मामा तलावात कालांतराने माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. अनेक लोकांनी अतिक्रमण करून तलावाच्या पोटात घर बांधकाम सुरू केले आहे, तर राजकीय वरदहस्तप्राप्त काहींनी चक्क तलावाच्या पोटात शेतीजमीनसुद्धा काढली. गावातील अनेक जागरूक नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. दुर्लक्षामुळे तलावाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत गेले. गुरुवारी तलावाच्या जागेची माेजणी करताना अतिक्रमणधारकांचा विराेध हाेऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल तसेच भूमी अभिलेखचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाेलाविले हाेते. भूमी अभिलेख विभागाकडून उपअधीक्षक एन.जी. पठाण, भूकरमापक समय्या बोमानवार, विघेश मोरगू यांनी तलावाची मोजणी सुरू केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माेजणीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. याप्रसंगी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, स्वप्नील श्रीरामवार, संतोष अर्का, शंकर बोलूवार, भाग्यश्री बेझलवार, पुष्पा अलोणे, शारदा कडते, अनुसया सोप्पीडवार, सुगंधा मडावी, सुमन खोब्रागडे, बेबीताई आत्राम आदी ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गड्डमवार, ग्रामसेविका संध्या गेडाम, तलाठी रवी मेश्राम, ज्येष्ठ नागरिक सुकरू कोरेत, संतोष तोडसाम, व्येंकटी सल्लम, पराग पांढरे, जुलेख शेख, दौलत कोरेत, किशोर सडमेक आदी उपस्थित होते.
६५ एकराचा तलाव बनला बाेडी
आलापल्ली येथील तलाव मूळ २६.३ हेक्टर म्हणजेच जवळपास ६५ एकरामध्ये विस्तारला आहे. या विशालकाय तलावाला आज बोडीचे रूप प्राप्त झाले आहे. सध्या जेमतेम २० एकर जागेत तलाव शिल्लक आहे. अतिक्रमण वाढत गेल्यास संपूर्ण तलाव गिळंकृत केला जाण्याची शक्यता आहे. हा धाेका ओळखून अतिक्रमण हटाव माेहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण काढल्यानंतर तलावाचे खाेलीकरण, तसेच साैंदर्यीकरण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असा मानस सरपंच शंकर आत्राम यांनी ‘लाेकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केला. तलावाचे खाेलीकरण झाल्यास जल साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल, अशी नागरिकांना आशा आहे.