बाल रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:42+5:302021-02-06T05:08:42+5:30

कार्यालयांमध्ये दस्तऐवजांचा पसारा वाढला देसाईगंज : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाईलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या ...

Encroachment in front of a children's hospital is dangerous | बाल रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक

बाल रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक

Next

कार्यालयांमध्ये दस्तऐवजांचा पसारा वाढला

देसाईगंज : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाईलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाईल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाईलचा गठ्ठा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तऐवजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे.

चुरचुरा-पिपरटोला मार्गाची दुरूस्ती करा

गडचिरोली : तालुक्यातील चुरचुरा-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

राजपूर, बोरी भागात बँक शाखा सुरू करा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील राजपूर पॅच व बोरी येथील लोकसंख्या पाच ते सहा हजार आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या वयोवृद्ध नागरिकांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे. या वयोवृद्ध नागरिकांना योजनेच्या मानधनाची रक्कम घेण्यासाठी २५ ते ३० किमीचे अंतर गाठून बसथांब्यावर जावे लागते. त्यामुळे राजपूर पॅच व परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोहझरीतील मार्गाचे डांबरीकरण करा

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मोहझरी या गावातून आरमोरी-मानापूर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पोच मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. या मार्गावर अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. मोहझरी येथील अंतर्गत रस्ते सुद्धा उखडले आहेत. जिल्हा परिषदेने गावातील रस्त्यांसाठी निधी मंजूर करून याही रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे दुर्लक्ष

गडचिरोली : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र यासाठी अनुदानाची तजवीज शासनाने करून दिली नसल्याने अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. या अनुदान देण्याची मागणी होत आहे.

पुसूकपल्ली थांब्यावर बस थांबवा

आलापल्ली : टेकमपल्ली आणि पुसूकपल्ली ही दोन गावे अहेरी-सिरोंचा मार्गावर आहेत. या गावातील अनेक विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात. मात्र, या बस थांब्यावर जलद बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बस थांबविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.

सौरऊर्जेवरील अनेक नळ योजनांना घरघर

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युत सुविधा नाही. तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या गावांमध्ये सौर ऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रा.पं.च्या दुर्लक्षितपणामुळे अनेक योजनांमध्ये बिघाड आल्याने त्या बंद आहेत. दुरूस्ती करणारी एजन्सी दुर्गम गावात पोहोचण्यास विलंब होत आहे.

प्रवाशी निवाऱ्याला झुडुपांचा वेढा

मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र, या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते.

७० टक्के ग्रामपंचायतीत नेट कनेक्टीव्हीटीचा अभाव

गडचिरोली : विद्यमान सरकारने ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्धार केला आहे. मात्र, शासनाचा हा संकल्प गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी होऊ शकला नाही. जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के ग्रामपंचायती इंटनरेट सुविधेपासून वंचित आहेत. तसेच जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये वीज सुविधा पोहोचलीच नसल्याची माहिती आहे. इंटनरेट कनेक्टीव्हीटीचा अभाव असल्याने ग्रामसेवक खासगी कॅफेतून कामकाज करीत आहेत.

बेलगावात भ्रमणध्वनी मनोरा उभारा

रांगी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या बेलगाव परिसरात भ्रमणध्वनी कव्हरेज राहत नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोरा उभारावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. बेलगाव परिसरात बीएसएनएलचे अनेक ग्राहक आहेत. या परिसरातील मौशीखांब, रानखेडा, मरेगाव येथेही बीएसएनएलचा कव्हरेज राहत नाही. त्यामुळे बेलगाव येथे भ्रमणध्वनी मनोरा उभारावा, अशी मागणी होत आहे.

यंत्रांनी हिरावला ग्रामीणांचा रोजगार

धानोरा : विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात आता होऊ लागला आहे. याला कृषी क्षेत्रही अपवाद ठरले नाही. दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने कमी वेळेत चांगले काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातून यंत्राचा वापर कृषी क्षेत्रातही वाढला आहे.

चामोर्शीतील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करा

चामोर्शी : चामोर्शी शहरातील शिवाजी ते बायपासकडे जाणाऱ्या मार्कंडादेव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावरून मार्कंडादेव येथे जाण्यासाठी भाविकांची वर्दळ राहते. सदर मार्ग डांबरी असला तरी डांबर शोधणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी गिट्टी व रेती बाहेर पडली आहे. कच्च्या मार्गाप्रमाणे सदर मार्ग दिसत आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे नेताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनांचे अतिक्रमण वाढले

आलापल्ली : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी आलापल्ली येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे आलापल्लीमध्ये वाहतुकीची कोंडी वाढली आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक

देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करा

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले

गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.

Web Title: Encroachment in front of a children's hospital is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.