अहेरीत अतिक्रमण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:58+5:302021-03-20T04:35:58+5:30
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ...
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आकाशवाणी केंद्र नाही
गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष हाेत आहे.
ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावी, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून काही धूळ खात आहेत. परिणामी, ऑनलाइन कामाचा बोजवारा उडाला आहे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंद स्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे. गाेकुलनगर परिसरात ही समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तलावाभोवती अतिक्रमण
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचन विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे. तलाव साैंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
गडचिरोली : दररविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी आहे.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : शहराजवळची शेकडो एकर जागा आहे. एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. काही भूखंडांवर वर्षभराचा कालावधी उलटूनही उद्योग स्थापन केले नाही.
वीजचोरी वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय, त्याचा व्यापा-यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी आहे.
तलावात साचली घाण
आरमोरी : शहराच्या मध्यभागी असलेल्या रामसागर तलावात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या रामसागर तलावाच्या साफसफाईकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. न.प. प्रशासनाने लक्ष द्यावे.
टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
आरमोरी : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी सुरक्षित करण्याची गरज आहे.
परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहे.
अनावश्यक फलक हटवा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नवीन आराेग्य केंद्र बांधा
भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी हाेत आहे.