रस्त्यालगतच्या जागेवर अतिक्रमण
By admin | Published: May 23, 2017 12:46 AM2017-05-23T00:46:35+5:302017-05-23T00:46:35+5:30
जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या चपराळा देवस्थानाकडे जातांना आष्टी ते चपराळा मार्गावर इल्लूर, ठाकरी, कुनघाडा माल येथील शेतकऱ्यांनी रस्त्यालगत ....
शेतकऱ्यांनी टाकली माती : जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष;बससेवेलाही अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या चपराळा देवस्थानाकडे जातांना आष्टी ते चपराळा मार्गावर इल्लूर, ठाकरी, कुनघाडा माल येथील शेतकऱ्यांनी रस्त्यालगत असलेल्या शेतातील पाळ खोदून माती रस्त्यावर टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.
आष्टी-चपराळा मार्गे असंख्य भाविक देवदर्शनासाठी चपराळा येथे जातात. या रस्त्यालगत असलेल्या शेताचा पूर्वीचा धुरा रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला ३० फुट होता. ६० फुटाचा हा रस्ता होता परंतु शेतकऱ्यांनी पाळ बांधत असताना धुरा तोडून सरळ ती पाळ रस्त्यापर्यंत भिडवली. आणि दोन्ही बाजूंनी रस्त्याची पूर्ण जागा गिळंकृत केली. सध्या २५ फुटाचा रस्ता शिल्लक राहिला असून दोन चारचाकी वाहन विरूद्ध दिशेने आल्यास वाहन ओलांडणे कठिण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाळ खोदून सरळ माती रस्त्यावर टाकल्याने पुन्हा हा रस्ता अरूंद झाला आहे. तर ठाकरी येथे एका शेतकऱ्याने रस्त्याच्या जागेवर तारेचे कुंपन केलेले आहे. काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या जागेवर कापसाच्या ढिगांसाठी वापर केला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
चपराळा येथे महाशिवरात्रीला दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. असंख्य भाविकांना गर्दीमुळे वाहने चालविताना त्रास सहन करावा लागतो. मात्र याकडेही शासन व प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. बांधकाम विभागाचे अभियंता या देवस्थानकडे कधीच फिरकलेच नसावे, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाल्याने एसटी महामंडळाची बसही पावसाळ्यात बंद करावी लागते. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयात ये- जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात या मार्गाने चालत अथवा खासगी वाहनाने येण्याची वेळ येते. शासन व जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन जि. प. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना द्याव्या व रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटवून या रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर पंदिलवार यांनी केली आहे.