क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:02 AM2018-02-22T01:02:58+5:302018-02-22T01:03:53+5:30
अतिशय चर्चेचा विषय ठरलेल्या चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण कायदेशिर मार्गाने हटविले जाईल, ....
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : अतिशय चर्चेचा विषय ठरलेल्या चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण कायदेशिर मार्गाने हटविले जाईल, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी मंगळवारी चामोर्शी येथे तहसील कार्यालयात पार पडलेल्या तालुका क्रीडा संकूल कार्यकारिणी समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण केव्हा हटणार याकडे तालुकावासीयांचे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे.
१० कोटी रूपयांचा खर्च करून सर्व सोयीसुविधा युक्त तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती नियोजित तीन हेक्टर जागेवर केली जाणार आहे. या क्रीडा संकुलाच्या जागेचे सर्वेक्षण वास्तूशिल्पज्ञ सुधीर श्रीवास्तव यांनी करून ७.७७ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक व आराखडा तयार केला होता. या आराखड्यावरही चर्चा करून काही दुरूस्त्या सूचविण्यात आल्या. त्यामुळे नवीन अनुदानास पत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तालुक्यातील खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकूल उपयोगी ठरणार आहे. मंजूर तीन कोटी रूपयांशिवाय उर्वरित निधी व प्रशासकीय मान्यतेकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रीडा संकूल लवकर मार्गी लावले जाईल, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. या सभेला तहसीलदार अरूण येरचे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, उपअभियंता उरकुडे, तालुका क्रीडा अधिकारी मदन टापरे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, तनगुलवार, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक देवतळे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, उपाध्यक्ष जयराम चलाख, वास्तू विशारद सुधीर श्रीवास्तव उपस्थित होते.
असे राहणार क्रीडा संकूल
चामोर्शी येथे निर्माण होणाºया तालुका क्रीडा संकुलामध्ये ४०० मीटर धावपट्टी, फुटबॉल, व्हॉलिबॉल मैदान, मल्टीपर्पज हॉल, दोन बॅडमिंटन कोर्ट, बॉस्केट बॉल ग्राऊंड कम स्केटिंग ग्राऊंड, वॉटर टू सप्लाय प्ले ग्राऊंड, संरक्षक भिंत, स्टेटस गॅलरी, आॅफिस बिल्डींग, स्त्री-पुरूष शौचालय, सोलर लाईट सिस्टिम आदी मैदान व सोयीसुविधा राहणार आहेत. तालुका क्रीडा संकूल भव्य व सुसज्ज राहणार असून यासाठी अंदाजे १० कोटी रूपये खर्च होणार आहेत.
तालुका क्रीडा संकुलाकरिता सर्वे क्र. १४४२/१ मधील ८.२८ हेक्टर आर पैकी ३ हेक्टर आर जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंजूर करण्यात आली असून या जागेचा ताबा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मागील वर्षीच्या १५ डिसेंबरला देण्यात आला. सध्या क्रीडा संकुलासाठी तीन कोटी रूपये मंजूर आहे.